आमलाण शाळेतून साडेतीन लाखांचे साहित्य लांबवले

तालुक्यातील आमलाण जिल्हा परिषद शाळेतील डिजिटल क्लासरूममधून तीन लाख ७५ हजार रुपयांची चोरी झाल्याची माहिती शिक्षकांनी दिली . १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम होऊन त्याच रात्री शाळेत चोरी झाल्याची घटना घडली आहे . शाळेजवळ असलेल्या दूध डेअरीवर सकाळी दूध घालण्यासाठी ग्रामस्थ आले असता त्यांना वर्ग उघडा दिसला आणि सकाळी सहा वाजता ही घटना उघडकीस आली . आमलाण जिल्हा परिषद शाळेतील डिजिटल वर्गखोलीतील लोखंडी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून खोलीतील ५५ इंची मल्टिमीडिया एलईडी स्क्रीन , इन्व्हर्टर बॅटरी , वेब कॅमेरा , प्रोजेक्टर , साउंड सिस्टिम , प्रिंटर व इतर साहित्य चोरट्यांनी चोरून नेले आहे . शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर कोकणी सरपंच राजेश कोकणी , पोलिस पाटील अर्जुन वसावे मुख्याध्यापक बाळकिसन ठोंबरे यांनी घटनास्थळी देऊन पाहणी केली . तसेच शिक्षकांनी शाळेतील चोरीसंदर्भात बाळकिसन ठोंबरे यांनी नवापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे नवापूर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून लवकरच चोरट्यांना जेरबंद करण्यात येईल असे सांगितले . लोकसहभाग आणि अनेक प्रयत्नाने निर्माण केलेल्या डिजिटल साहित्यचोरीला गेल्यामुळे सर्व पालक व शिक्षकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे . पोलिसांनी या घटनेचा गांभीर्याने तपास करून चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.