दिवाळीपूर्वी शाळा सुरू करणे मुश्किल , उपमुख्यमंत्री अजित पवार

शेअर करा.

पुणे : शाळा सुरू करण्यासाठी काही संस्थाचालक व पालक आग्रहाची विनंती करत आहेत ; परंतु दिवाळीपूर्वी शाळा सुरू करण्यास टास्क फोर्सचा विरोध आहे . तर १८ वर्षांवरील ज्या विद्यार्थ्यांचे , त्यांना शिकविणारे शिक्षक , कॉलेजमधील इतर कर्मचारी यांचे लसीकरण पूर्ण झाले असेल तर सर्व नियमांचे पूर्णपणे पालन करून कॉलेज सुरू करण्यास हरकत नाही , असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे व्यक्त केले .

पुणे शहर आणि जिल्ह्याचा कोरोना आढावा घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत पवार यांनी ही माहिती दिली . कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली असून , बहुतेक सर्व गोष्टी सुरू करण्यात आल्या आहेत , मग राज्यातील शाळा उघडणार का , असा प्रश्न पत्रकारांनी विचारला . यावर पवार म्हणाले , राज्यात कोरोनाचे रुग्ण कमी होत आहेत ही वस्तुस्थिती असली तरी सरसकट शाळा सुरू करणे कठीण आहे . पहिल्या टप्यात राज्यातील ज्या दहा जिल्ह्यांमध्ये सध्या कोरोनाचा एकही रुग्ण नाही , अशा जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याचा विचार होऊ शकतो . टास्क फोर्स व तज्ज्ञांच्या मते राज्यात अद्यापही लसीकरणाचा मोठा टप्पा गाठायचा आहे .

आधी कमीत कमी दोन डोस तरी मिळू देत; बूस्टर डोसचे नंतर पाहू
पुण्यातील एका कार्यक्रमात लसीचे दोन डोस घेतलेल्या लोकांना आता बूस्टर डोस दिय्याला हवा, असे मत सायरस पूनावाला यांनी व्यक्त केले होते . यावर अजित पवार म्हणाले , लोकांना बूस्टर डोस दिला पाहिजे हे खरे असले तरी सर्व लोकांना किमान दोन डोस तरी मिळाले पाहिजेत , असा आमचा प्रयत्न आहे . ज्या लोकांना पैसे देऊन खासगीत बूस्टर डोस घ्यायचा आहे , त्यांनी घेतल्यास आमची हरकत नाही .

शेअर करा.
Default image
KhandeshTimes
Articles: 489

Leave a Reply