श्रावण म्हणजे काय : नुसता महिना नव्हे तर त्याचे अनेक महत्व.

श्रावण महिन्यात सर्वत्र हिरवळ पसरते . क्षणात पाऊस पडतो , तर दुसऱ्या क्षणाला ऊन पडते . ऊनपावसाचा हा लपंडाव पाहून मन आनंदाने फुलून जाते .श्रावण म्हणजे जीवनाच्या आनंदयात्रेतला एक उत्सवच जणू . ज्येष्ठ – आषाढात दमदार कोसळणारा पाऊस श्रावणात थोडा रमत – गमत , उन्हाशी लपंडाव खेळतच बरसतो . जणू काही दोन महिन्यांच्या अविरत परिश्रमांनंतरची थोडी विश्रांतीच ! या काळातच सृष्टी बहरते आणि नवे रूप लेवून सजते … या वेळी अवनी धारण करत असते निसर्गदत्त सौंदर्याचा आविष्कार … आणि आकाशही त्याला अपवाद नसतं … कारण ऊन – पावसाच्या खेळातूनच नभात साकारतं सप्तरंगी इंद्रधनू … साहजिकच सारा आसमंतच मोहरून जातो आणि आपल्या जगण्याचं अवकाशही … नवा उत्साह मिळतो आपल्याला … अन् जगण्याची उमेदही … रिफ्रेश करून टाकतो हा माहौल … शहरातल्या गर्दीत कदाचित हे सारंच्या सारं नसेल मिळत अनुभवायला … अशा श्रावण महिन्याचा उद्या बघता बघता शेवटचा दिवस श्रावण अमावस्या अर्थात बैल पोळा आला , म्हणजे मराठी बारा महिन्यातील सगळ्यांच्या लाडक्या महिन्याचा शेवटचा दिवस आला , भाद्रपद लागून गणपती , लक्ष्मी आदी येण्याची लगबग सुरू होईल.तसा श्रावणातील बैल पोळा , म्हणजे शेतकन्यानच्या मित्र असलेल्या बैलाचा सण ! वर्षभर शेतात राबणाऱ्या या मित्राला शेतकरी पूर्णपणे विश्रांती देवून , त्याला रंगवून , बाशिंग बांधून सजवले जाते.त्याची पूजा करून त्याला नमस्कार करून आजच्या दिवशी गोडधोड पदार्थ , पुरणपोळी वगैरे खावू घालतात , सारे कुटुंबीय त्याच्या परी आदर व्यक्त करून , त्याला वाजत गाजत गावातून मिरवले जाते , काही ठिकाणी या सणाला बेंदुर म्हणतात , ज्यांचे घरी बैल नाहीत त्या घरी सुद्धा बैलाच्या मातीच्या प्रतिकृती बनवून त्याला पूजतात.तसा श्रावण महिन्यात आषाढातील मुसळधार पावसामुळे सृष्टी हिरवे वसन लेवून हिरवीगार दिसते.

श्रावणातील पाऊस हा आषाढातील पवसासारखा धुवांधार नसला तरी तो मनभावक असतो , क्षणात ऊन , क्षणात पाऊस अशी स्थिती असते.त्यावर बालकवी लिहितात , ” श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे , क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे . अश्याया मनमोहक पावसानंतर आकाशात सुंदर सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसू लागते , त्यावर बालकवी लिहितात , ” वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे , मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे || झालासा सूर्यास्त वाटतो सांज अहाहा उघडे , तरू शिखरावर उंच ढगांवर पिवळे पिवळे ऊन पडे || असा हा श्रावण महिना अगदी दिवाळी , तुलसी विवाह इथपर्यंतच्या सर्व सणावाराची सुरुवात करून देतो . नागपंचमी श्रावणी सोमवार , शुक्रवार चे उपवास , तसेच बहीण भावाच्या पवित्र प्रेमाच्या रक्षाबंधन अर्थात राखी पौर्णिमा अशी सुरुवात होते.नागपंचमीला सर्व स्त्रिया हातावर सुंदर मेंदी डिझाईन काढतात , नेलपेंट लावतात , सजून धजून नागोबाची पूजा करून मैत्रिणी बरोबर फेर धरून , जागोजागी बांधलेल्या झोक्यांवरुन उंच उंच झोके घेऊन आनंद घेतात.एकमेकिना हळदी कुंकू लावून लाह्या , फुटाणे दिले जातात . श्रावणातील ऊन पाऊस खेळाला लहानपणी आम्ही कोल्हा कोल्हिचे लग्न सुरू झाले असे म्हणायचो , या श्रावणसरी मध्ये भिजण्याची एक आगळी वेगळी अशी मजा येते.सणवार येणाऱ्या या श्रावण महिन्यात घाडा , दुर्वा , निरनिराळी , रंगीबेरंगी फुले , याची रेलचेल असते . देव्हारे निरनिराळ्या फुलांनी सुंदर सजलेले दिसतात , हे सर्व पाहून श्रावण मनभावनं होऊन जातोbश्रावणाची आणि त्याच्या पावसाची अशी जादू आहे , धरणी हिरवा शालू ल्यालेली आहे , बाहेर ऊन पाऊस खेळ चालू असताना भुईमुगाच्या भाजलेल्या शेंगा , त्यासोबत हिरवी चटणी , मक्याचे भाजलेले , तिखट , मीठ लावून लिंबू पिळून दिलेले गरमागरम कणीस , गरम कांदा भजी , मिरची भजी खात खात , वाफाळलेला चहा पिण्यातला आनंद घेणारे खरे श्रावण रसिक होत . श्रावण हा चातुर्मासातील श्रेष्ठ असा आनंदी महिना म्हणल्यास वावगे ठरणार नाही हा तना मनात नव चैतन्य निर्माण करतो , तसा हा हिरवाई मुळे नेत्रसुखद असाही आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.