सिनेमास्टाईल चोरी ; लिफ्टच्या रोपने खाली उतरून शोरूममध्ये प्रवेश : महागडे साहित्य लांबवले.

सध्या शहरात चोरीचे प्रमाण वाढत असून अजून एक प्रकरण समोर आले आहे चोरट्याने चक्क सिनेमास्टाईल एका लिफ्टच्या रोपने सुमारे २० फूट अंतर खाली उतरून चोरट्याने दुचाकीच्या शोरूममध्ये प्रवेश केला . या शोरूममधून त्याने एक लॅपटॉप व मोबाइल चोरी केला . सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे . कोंबडी बाजारातील पंकज टीव्हीएस शोरूममध्ये सोमवारी रात्री ११.१५ चोरट्याने वाजता ही चोरी झाली आहे . हे शोरूम सोमवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास बंद करून मालक योगेश चौधरी यांच्यासह कर्मचारी घरी निघून गेले होते . यांनतर रात्री ११.१५ वाजता मागच्या बाजूने शोरूमच्या आवारात एका चोरट्याने प्रवेश केला . त्याने लिफ्टचा लोखंडी दरवाजा उघडला . त्यानंतर रोपच्या साह्याने सुमारे २० फूट अंतर खाली उतरून शोरूमचा तळमजला गाठला . तेथील एक कुलूप तोडून थेट शोरूममध्ये प्रवेश केला . त्यामुळे शोरुममध्ये लावलेल्या तीन सीसीटीव्ही कॅमेरात चोरटा चित्रित झाला आहे . या चोरट्याने शोरूममध्ये प्रवेश करताच चौधरी यांच्या केबिनमध्ये ठेवलेला ७० हजार रुपयांचा लॅपटॉप व १२०० रुपयांचा मोबाइल काढून घेतला . यानंबर बाहेर येऊन एक तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला . या तिजोरीत काही कागदपत्र व धनादेश होते ; परंतु तिजोरी त्याच्याकडून फुटली नाही . यानंतर त्याने सुमारे अर्धा तास अत्यंत निवांतपणे शोरूममधील अनेक ड्रॉवर उघडण्याचा प्रयत्न केला . याच दरम्यान , सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डीव्हीआर मशीन दिसून आल्याने चोरट्याने वायर कापून कॅमेरे बंद केले . त्यामुळे चोरटा कधी बाहेर पडला याची माहिती होऊ शकली नाही . शोरुम ज्या मार्गावर आहे त्या मार्गावर रात्री उशिरापर्यंत वर्दळ असूनही चोरी झाल्याने पोलिस गस्त व्यवस्थित होत नसल्याचे यातून समोर आले आहे . त्यामुळे पोलिस गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.