• Tue. Aug 16th, 2022

  सोमवारपर्यंत कामावर आल्यास निलंबन मागे , अन्यथा कारवाई .

  ByKhandeshTimes

  Dec 11, 2021

  मुंबई : संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी सोमवारपर्यंत कामावर हजर व्हावे . जे कर्मचारी निलंबित असतील त्यांचे निलंबन मागे घेतले जाईल अन्यथा सोमवारनंतर कारवाई तीव्र करण्यात येईल , असा इशारा परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड . अनिल परब यांनी शुक्रवारी दिला . एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करा , या मागणीसाठी हा संप सुरू आहे . यासंदर्भात परब यांनी शुक्रवारी अधिकाऱ्यांसोबत बैठक महामंडळाच्या घेऊन राज्यातील आगारातील गाड्यांचा व कर्मचारी उपस्थितीचा आढावा घेतला . त्यावेळी ते बोलत होते .

  अॅड . परब म्हणाले की , संपात सहभागी कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय बाब म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे . जे कर्मचारी कामावर येण्यास तयार आहेत त्यांना सकारात्मक वातावरणामध्ये कामावर रुजू करून घेण्यासाठी निलंबनासारखी कारवाई मागे घेण्याबाबत एसटी महामंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे . या संधीचा लाभ घेऊन निलंबित कर्मचाऱ्यांनी मुख्य प्रवाहात सामील व्हावे . जेणेकरून संबंधितांना भविष्यात कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागणार नाही . संपामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता , शाळा , महाविद्यालयातील विद्यार्थी , ज्येष्ठ नागरिक आदींना नाहक त्रास होत आहे . त्यांना एसटीची सेवा मिळावी यासाठी आम्ही त्यांना बांधील आहोत . प्रवासी हे आपले ग्राहक आहेत . हा ग्राहक आपल्यापासून तुटू नये यासाठी कर्मचाऱ्यांनी समजूतदारपणा दाखवून संप मागे घ्यावा , असे आवाहन अॅड . परब यांनी केले .

  Leave a Reply

  Your email address will not be published.