
कुऱ्हा प्राथमिक आरोग्य केंद्राची छत-दुरुस्ती फक्त पाच दिवसांत पूर्ण; रुग्णसेवा पुन्हा सुरु
सीईओ मीनल करणवाल यांची आरोग्य केंद्राला भेट
जळगाव : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करणवाल यांनी २० ऑगस्ट २०२५ रोजी कुऱ्हा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. त्यांनी नव्याने बांधण्यात आलेल्या कोविड कक्षाच्या छताची अत्यंत खराब स्थिती पाहिली आणि या अयोग्य परिस्थितीबाबत गंभीर लक्ष वेधले.
मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी तातडीने ठेकेदाराला दुरुस्तीचे आदेश दिले. त्यांच्या तत्पर हस्तक्षेपामुळे केवळ पाच दिवसांतच छतासह इतर किरकोळ दुरुस्त्या पूर्ण करून इमारतीचा वापर पुन्हा सुरु करण्यात आला.
सदर आरोग्य केंद्रात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली असून आता येथे बाह्यरुग्ण तपासणी (OPD) तसेच आंतररुग्ण सेवा (IPD) दोन्ही सुरु होतील. या सेवांच्या पुनर्संचालनामुळे गावकऱ्यांमध्ये समाधान निर्माण झाले असून, नागरिकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांचे कौतुक केले आहे.
ही तत्पर कारवाई आरोग्य सुविधांच्या कार्यक्षमतेला चालना देणारी ठरली असून, गावकऱ्यांनी त्वरित निर्णयक्षमतेसह समस्या सोडवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे विशेष स्वागत केले आहे.





