
जळगाव: जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत माजी उपमहापौर सुनील महाजन यांनी बाजी मारत ही निवडणूक जिंकली आहे. या निवडणुकीत त्यांच्या विरोधात ऐनवेळी उतरलेले लक्ष्मण गंगाराम पाटील यांना पुन्हा एकदा अपयश आले.
काही दिवसांपूर्वी बाजार समितीचे सभापती श्यामकांत सोनवणे यांच्या विरोधात १८ पैकी १४ सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. हे सर्व सदस्य सहलीवर गेल्यामुळे राजकीय वातावरण तापले होते. अविश्वास प्रस्तावाला सामोरे जाण्याआधीच श्यामकांत सोनवणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त झालेल्या सभापतीपदासाठी आज विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.
सभापतीपदासाठी सुनील महाजन, मनोज दयाराम चौधरी आणि लक्ष्मण गंगाराम पाटील यांनी अर्ज दाखल केले होते. उपसभापतीपदासाठी मात्र गोकुळ चव्हाण यांनी एकमेव अर्ज दाखल केल्यामुळे त्यांची निवड बिनविरोध झाली.
सभापतीपदाच्या निवडणुकीतून मनोज चौधरी यांनी आपला अर्ज मागे घेतल्यामुळे सुनील महाजन आणि लक्ष्मण पाटील यांच्यात थेट लढत झाली. मतदानादरम्यान हात उंचावून घेण्यात आलेल्या मतदानात सुनील महाजन यांना १५, तर लक्ष्मण पाटील यांना केवळ दोन मते मिळाली. या निकालानंतर सुनील महाजन यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष साजरा केला. या पराभवामुळे ‘लकी’ टेलर म्हणून ओळख असलेले लक्ष्मण पाटील यांना पुन्हा एकदा सभापतीपदाने हुलकावणी दिल्याचे दिसून आले.





