
चाळीसगाव: शहरातील गायत्री कॉम्प्लेक्सजवळ रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या दुचाकीवर ऑनलाईन दंड आकारल्याच्या रागातून दुचाकी मालकाने वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता वाहतूक शाखेचे पोलीस नाईक चहल शिवाजी जाधव हे छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहतूक नियंत्रित करण्याचे काम करत होते. यावेळी राधे भोजनालयासमोर रस्त्याच्या मधोमध एक दुचाकी उभी असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी दुचाकी मालकाचा शोध घेतला, मात्र तो न सापडल्याने त्यांनी त्या दुचाकीवर ऑनलाईन दंड आकारला.
काही वेळानंतर दुचाकीचा मालक संजय बसंत पवार (वय २५, रा. चौधरीवाडा) हा दारूच्या नशेत घटनास्थळी आला. त्याने पोलिसाला “माझ्या गाडीवर कारवाई का करतो?” असे म्हणत एकेरी भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता त्याने पोलीस नाईक चहल जाधव यांची शर्टची कॉलर पकडून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात जाधव जखमी झाले.
सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलीस नाईक चहल जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून संजय पवार विरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.





