Breaking News l तरुणाची हत्या l जळगाव जिल्ह्यात खळबळ

जळगाव l २९ ऑगस्ट २०२५ l यावल l तालुक्यातील विरावली-दहिगाव रस्त्यावर एका २१ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणी दोन संशयित आरोपींनी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिली आहे.
काय आहे प्रकरण?
मयत तरुण इम्रान युनूस पटेल (वय २१) हा मूळचा धरणगाव तालुक्यातील हनुमंतखेडा येथील रहिवासी होता. सध्या तो यावल तालुक्यातील दहिगाव येथे आपल्या मामाकडे राहत होता. विरावली-दहिगाव रस्त्यावर असलेल्या खिरवा गावाजवळ त्याची हत्या करण्यात आली. घटनेनंतर, दोन संशयित आरोपी, ज्ञानेश्वर गजानन पाटील (वय १९) आणि गजानन रवींद्र कोळी (वय १९), यांनी स्वतः मोटारसायकलवरून यावल पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांसमोर हजर झाले आणि गुन्ह्याची कबुली दिली.
जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न?
गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात खुनाचे सत्र सुरू असल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. २० दिवसांपूर्वीच जामनेर तालुक्यात एकाची हत्या झाली होती. अशा घटनांमुळे, गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक राहिला नाही असा आरोप जनतेकडून केला जात आहे.
सध्या यावल पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण होते, मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. या खुनाचे नेमके कारण काय होते, याचा शोध पोलीस घेत आहेत.





