
जळगावात अट्टल वाहन चोरटे जेरबंद; २ गुन्ह्यांची उकल
शहर पोलीस गुन्हे शोध पथकाची मोठी कारवाई
जळगाव: जळगाव शहर पोलीस गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई करत दोन अट्टल वाहन चोरट्यांना अटक केली आहे. या कारवाईमुळे जळगाव शहर आणि धुळे जिल्ह्यातील साक्री पोलीस स्टेशन हद्दीतील असे एकूण दोन गुन्ह्यांची उकल झाली आहे.
जळगाव शहरातील हमाल वाडा, शिवाजी नगर येथे राहणाऱ्या उदयकुमार सुभाष कोचुरे यांची २४ ऑगस्ट रोजी रात्री ३०,००० रुपये किमतीची होंडा ॲक्टिव्हा मोपेड चोरीला गेली होती. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांनी दोन पथके तयार केली. त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, पथकाने इरफान खान उस्मान खान पठाण (वय २१, मूळ रा. साक्री, जि. धुळे, ह.मु. गेंदालाल मिल, जळगाव) याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने त्याचा मित्र अदिल शेख उर्फ नाट्या माजिद शेख (वय १९, रा. गेंदालाल मिल, जळगाव) याच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी चोरीची मोपेड जप्त करून दोघांनाही अटक केली आहे.
धुळे जिल्ह्यातील गुन्ह्याचीही कबुली
पोलीस कोठडीत असताना इरफान पठाणची अधिक चौकशी केली असता, त्याने नोव्हेंबर २०२४ मध्ये साक्री पोलीस स्टेशन, धुळे हद्दीतूनही एक हिरो होंडा कंपनीची फॅशन प्रो मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. साक्री पोलीस स्टेशनमध्येही या चोरीचा गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी ती मोटारसायकलही जप्त केली आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकातील सहायक फौजदार सुनील पाटील, पोलीस हवालदार उमेश भांडारकर, सतीश पाटील, योगेश पाटील, नंदलाल पाटील, विरेंद्र शिंदे, दीपक शिरसाठ, भगवान पाटील, पोलीस नाईक सुधीर साळवे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल ठाकूर, भगवान मोरे, प्रणय पवार आणि राहुलकुमार पांचाळ यांनी सहभाग घेतला.





