
ईद-ए-मिलादची शासकीय सुट्टी ८ सप्टेंबरला करण्याची मागणी
मरकझी जुलुसे ईद-ए-मिलाद-उन-नबी कमिटीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
जळगाव:– यावर्षी गणेश विसर्जन आणि ईद-ए-मिलाद-उन-नबी हे सण एकाच आठवड्यात येत असल्यामुळे, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ईदची शासकीय सुट्टी ५ सप्टेंबरऐवजी ८ सप्टेंबरला करण्याची मागणी जळगाव शहरातील मुस्लिम बांधवांनी केली आहे. याबाबत मरकझी जुलुसे ईद-ए-मिलाद-उन-नबी कमिटीने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवले आहे.
यावर्षी मुस्लिम बांधवांचा पवित्र सण ईद-ए-मिलाद-उन-नबी शुक्रवार, ५ सप्टेंबर रोजी येत आहे, तर दुसऱ्याच दिवशी शनिवार, ६ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन आहे. दोन्ही समाजांच्या मिरवणुका अत्यंत उत्साहात काढल्या जातात. दोन्ही सण जवळजवळ आल्याने मिरवणुका एकाच वेळी निघाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. हिंदू बांधवांना त्यांचा सण शांततेत साजरा करता यावा आणि प्रशासनावरील बंदोबस्ताचा ताण कमी व्हावा, यासाठी मुस्लिम समाजाने ईदची मिरवणूक (जुलूस) ५ सप्टेंबरऐवजी ८ सप्टेंबर, सोमवार रोजी काढण्याचा निर्णय घेतला आहे.
याच पार्श्वभूमीवर, ज्या दिवशी जुलूस काढून ईद साजरी केली जाईल, त्याच दिवशी म्हणजेच ८ सप्टेंबर रोजी शासकीय सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
हे निवेदन सादर करताना सुन्नी जामा मस्जिद जळगाव, सुन्नी ईदगाह ट्रस्ट आणि मरकझी जुलुसे ईद-ए-मिलाद-उन-नबी कमिटीचे अध्यक्ष सै. अयाज अली नियाज अली, सय्यद जावेद, अमान बिलाल, जावेद गुलाम गौस, सय्यद उमर, रईस चांद, शेख शफी, अयान अलीम आदी उपस्थित होते.





