
कुसुंबा येथून गावठी कट्ट्यासह यरुणाला ठोकल्या बेड्या !
एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई
जळगाव: शहरात बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. कुसुंबा गावातून एका संशयित आरोपीला अटक करून त्याच्याकडून १० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. अमोल सुरेश खैरनार (वय २८, रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
शनिवार, ३० ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास कुसुंबा गावाजवळ एक व्यक्ती गावठी पिस्तूल घेऊन दहशत माजवत असल्याची गुप्त माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी तात्काळ पथकाला कारवाईचे आदेश दिले.
उपनिरीक्षक राहुल तायडे आणि चंद्रकांत धनके यांच्यासह पोलीस कर्मचारी गणेश ठाकरे, किरण पाटील, नितीन ठाकूर आणि राहुल घेटे यांचे पथक घटनास्थळी रवाना झाले. पोलिसांची गाडी पाहताच संशयिताने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला शिताफीने पकडले.
आरोपीची झडती घेतली असता, त्याच्या कमरेला गावठी कट्टा आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करून तो कट्टा जप्त केला. याप्रकरणी पोलीस शिपाई राहुल घेटे यांच्या फिर्यादीनुसार, एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.





