
आमदार एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त २०० विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप
जळगाव प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त मेहरूण येथील श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात २०० गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. नाथ फाउंडेशनचे अध्यक्ष आणि श्रीराम प्राथमिक-माध्यमिक विद्यालयाचे सचिव अशोक लाडवंजारी यांच्या पुढाकाराने हा उपक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमात मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस ॲड. रवींद्र पाटील होते. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, महानगर अध्यक्ष एजाज मलिक, जिल्हा समन्वयक विकास पवार, विद्यालयाचे अध्यक्ष पन्नालाल वंजारी, माजी नगरसेवक राजू मोरे, सुनील माळी, डॉ. रिजवान खाटीक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात श्रीराम आणि सरस्वती देवीच्या पूजनाने झाली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले. यासोबतच शिक्षक दिनानिमित्त विद्यालयातील सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला.
यावेळी बोलताना प्रमोद पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वाय.एस. महाजन यांनी विद्यार्थ्यांना एकनाथ खडसे यांच्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांनीही खडसे यांच्या कार्याची माहिती देत, अशोक लाडवंजारी यांनी केलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. या उपक्रमाने निश्चितच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक प्रमुख अमित तडवी, प्रतिभा पाटील, दिनेश पाटील आणि सरस्वती पाटील यांनी केले. सूत्रसंचालन अतुल चाटे यांनी केले, तर आभार अमित तडवी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ईश्वरी वंजारी, मुख्याध्यापक दिवाकर जोशी आणि सर्व शिक्षक-कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.





