खान्देशजळगांवराजकीयसामाजिक

देवळाली – भुसावल शटल लवकरच धावणार – खा. उन्मेश पाटील

जळगाव – चाळीसगाव ,पाचोरा ते जळगाव दरम्यान नियमित ये -जा करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी धावणारी देवळाली भुसावल एक्सप्रेस (शटल) लवकरच पूर्वनिर्धारित वेळेनुसार सुरू करण्यात येईल असे आश्वासन रेल्वेमंत्री ना. रावसाहेब दानवे -पाटील यांनी दिल्याने प्रवासी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खा. उन्मेश पाटील यांचे प्रवाशी व प्रवाशी संघटनांनी आभार मानले आहेत..

याबाबत सविस्तर माहिती अशी की माननीय खासदार उन्मेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा येथील भाजपा अध्यक्ष अमोल शिंदे यांच्यासह पाचोरा रेल्वे स्टेशन सल्लागार समितीच्या शिष्टमंडळाने रेल्वेमंत्री ना. रावसाहेब दानवे व रेल्वे बोर्डाचे चेअरमन अनिल कुमार लाहोटी यांची नुकतीच दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी देवळाली भुसावळ शटल लवकरच पूर्व निर्धारित वेळेनुसार धावेल असे आश्वासन मंत्री दानवे पाटील ,चेअरमन लाहोटी यांनी भेटीदरम्यान दोन्ही मान्यवरांनी शिष्टमंडळाला दिले आहे.

शटल रेल्वे पूर्वनिर्धारित वेळेनुसारच – प्रवाश्यांमध्ये आनंद
खान्देशातील प्रवाशांच्या सोयीची शटल रेल्वे सेवा म्हणजेच देवळाली भुसावल एक्सप्रेसच्या वेळेत कोरोना काळात बदल झाला होता. परिणामी मनमाड ते भुसावल दरम्यान दररोज ये-जा करणारे प्रवासी, नोकरदार व चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले होते. प्रवाशांच्या समस्या लक्षात घेऊन खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या नेतृत्वात पाचोरा भाजपा तालुका अध्यक्ष अमोलभाऊ शिंदे यांचे सह पाचोरा रेल्वे स्टेशन सल्लागार समितीचे सदस्य तथा प्रवासी परिषदेचे जनरल सेक्रेटरी प्रभू पाटील, सल्लागार सदस्य गिरीश बर्वे , अनिल चांदवानी, राजेंद्र बडगुजर, निलेश कोटेचा यांनी नवी दिल्ली येथे रेल्वेमंत्री नामदार रावसाहेब दानवे व रेल्वे बोर्डाचे चेअरमन माननीय अनिल कुमार लाहोटी यांची भेट घेतली. या भेटीत देवळाली भुसावल शटलच्या मागणीबाबत लोकसभेचे अधिवेशन संपल्यावर लगेचच होणाऱ्या रेल्वे बोर्डाच्या बैठकीत या विषयावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन रेल्वे मंत्र्यांनी दिले. यावेळी प्रवाशांच्या सोयीसाठी वेगवेगळी निवेदने मान्यवरांना देण्यात आली, या निवेदनावर उपरोक्त उपस्थित सदस्यांसह हिरालाल चौधरी, ॲड. प्रशांत नागणे, प्रदीपकुमार संचेती, राजू धनराळे व प्रमोद सोमवंशी यांच्यासह अनेक प्रवाश्यांच्या स्वाक्षरी आहेत.

पी जे रेल्वे नंतर पुन्हा खासदारांची खंबीर आग्रही भूमिका

या दिल्ली भेटीत दोन्ही मान्यवरांनी शटल रेल्वेची आवश्यकता व उपयोगिता जाणून घेतली. शटलच्या पूर्वनिर्धारित वेळेला पर्याय म्हणून अजंता एक्सप्रेस मनमाड ऐवजी भुसावळ पासून सुरू करण्याबाबत आणि धुळे ते चाळीसगाव मेमो रेल्वे सेवा जळगाव पर्यंत वाढविण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली. तसेच अक्कलकोट, तुळजापूर व पंढरपूरला जाणाऱ्या खानदेशातील भाविकांसाठी साप्ताहिक धावणाऱ्या यशवंतपुरम- अहमदाबाद एक्सप्रेस ला पाचोरा व चाळीसगाव येथे थांबा देण्यात यावा अशी करीत खासदार उन्मेश दादा पाटील यांनी खंबीर आग्रही भूमिका मांडली.

अमृत भारत योजनेत पाचोरा रेल्वे स्थानकाचा समावेश

या भेटीदरम्यान खासदार उन्मेशदादा पाटील यांनी पाचोरेकरांसाठी अत्यंत आनंददायी घोषणा करत “अमृत भारत” योजनेत पाचोरा रेल्वे स्थानकाचा समावेश केल्याचे जाहीर केले. खासदार उन्मेशदादा यांच्या प्रयत्नाने पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील अमृत भारत योजनेत पाचोरा रेल्वे स्थानकाचा समावेश झाल्याने भारतातील अत्याधुनिक रेल्वे स्टेशन प्रमाणेच पाचोरा स्थानकाचा अभूतपूर्व विकास होऊन स्थानकाचा चेहरा मोहरा बदलणार आहे. सुमारे 37 कोटी रुपयांचा विकास निधी यासाठी मंजूर करण्यात आला आहे.खासदार उन्मेशदादा पाटील यांनी दोन वर्षापूर्वी पाचोरा जामनेर रेल्वे प्रसंगी उद्भवलेल्या अडीअडचणी सोडवित हा मार्ग पुन्हा नव्याने सुरु करण्यासाठी घेतलेल्या भूमिकेचे परिसरातील प्रवासी, प्रवासी परिषद व पाचोरा परिसरातील जनतेने, सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी खासदारांच्या लोकाभिमुख प्रयत्नांचे कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button