
एरंडोल पोलीस ठाण्याचा हवालदार ३ हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात
एरंडोल | प्रतिनिधी
एरंडोल पोलीस ठाण्यातील हवालदार बापू लोटन पाटील हा ३ हजार रुपयांची लाच घेताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाच्या जाळ्यात रंगेहाथ अडकला. या कारवाईमुळे पोलिस विभागात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या एका अपघातात जप्त केलेली दुचाकी परत देण्यासाठी हवालदार बापू लोटन पाटील यांनी म्हसवे (ता. पारोळा) येथील तक्रारदाराकडे पैशांची मागणी केली होती. अपघातात स्वतः जखमी झालेल्या तक्रारदाराकडून त्यांनी तडजोडीअंती ३ हजार रुपयांची मागणी स्वीकारली.
ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने एरंडोल हायवे चौफुली येथे पाटील यांना रक्कम देण्यासाठी बोलावले. त्याच वेळी धुळे एसीबीच्या पथकाने सापळा रचत बापू पाटील यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
घटनेनंतर आरोपी बापू पाटील यांना पुढील चौकशीसाठी धुळ्याला नेण्यात आले असून, या प्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.





