
कौटुंबिक वादातून एकाचा खून; दुसरा गंभीर जखमी
भुसावळ शहरातल्या घटनेने खळबळ
भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ शहरातील अयान कॉलनी येथे कौटुंबिक वादातून झालेल्या भांडणात एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पत्नीसोबतच्या वादात मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या तिच्या वडिलांवर आणि एका नातेवाईकावर पतीने धारदार चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात नातेवाईकाचा जागीच मृत्यू झाला असून, वडील गंभीर जखमी झाले आहेत.
शुक्रवार, १२ सप्टेंबर रोजी दुपारी अयान कॉलनीतील सुभान शेख भिकन याचे त्याच्या पत्नीशी जोरदार भांडण झाले. पत्नीने ही माहिती धुळ्यातील वडील शेख जमील शेख शकूर (वय ५२) यांना दिली. यानंतर, रात्री ८ च्या सुमारास शेख जमील आपल्या मुलीच्या मदतीसाठी कंडारी येथील नातेवाईक शेख समद शेख इस्माईल (वय ४०) यांना घेऊन भुसावळला आले.
सुभानला समजावण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्यात जोरदार वाद झाला. या वादामुळे संतप्त झालेल्या सुभानने धारदार चाकूने समदच्या मानेवर, छातीवर आणि पोटावर सपासप वार केले. तसेच, त्याने सासरे शेख जमील यांच्यावरही वार करून त्यांना जखमी केले.
दोन्ही गंभीर जखमींना तातडीने भुसावळ येथील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी शेख समद याला मृत घोषित केले, तर जमील शेख यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींची विचारपूस केली. संशयित आरोपी सुभान शेख याला ताब्यात घेऊन अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या घटनेमुळे भुसावळ शहर पुन्हा एकदा हादरले असून, या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. मृत समद शेख यांच्या पश्चात भाऊ, पत्नी आणि मुले असा परिवार असून, ते हात मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.





