
शेती साहित्यासह अनेक चोऱ्या करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश !
नऊ जणांना अटक, मुख्य आरोपी फरार ; १२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
दहा गुन्ह्यांचा लागला छडा ; निंभोरा व एलसीबी पोलीसांची धडाकेबाज कामगिरी
जळगाव प्रतिनिधी :शेती उपयोगाचे साहित्य, तोलकाटा वरील बॅटरी-इन्व्हर्टर साहित्य तसेच मोटारसायकल व कार चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश निंभोरा पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केला असून याप्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी फरार झाला आहे. आरोपींकडून तब्बल १२ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून निंभोरा, सावदा, यावल, रावेर, मुक्ताईनगर परिसरात शेतकऱ्यांचे शेतीसाठी लागणारे साहित्य, तोलकाट्यावरील साहित्य, मोटारसायकल चोरीच्या तक्रारी वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर निंभोरा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी हरीदास बोचरे यांनी पोलीसांचा पथक तयार करून पंधरा दिवसांपासून नाकाबंदी, रात्रगस्त, तांत्रिक तपास सुरू केला. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ११ सप्टेंबर रोजी सकाळी संशयित विलास उर्फ काल्या सुपडु वाघोदे (रा. वडगाव नदीकाठी) याचा शोध घेतला असता तो पोलीस पाहून पसार झाला. मात्र त्याच्या झोपडीतून एक ममहिलाहाती लागली. तपासात तिने वाघोदे व त्याच्या साथीदारांनी विविध ठिकाणी चोरी केल्याचे उघड केले.
या कबुलीच्या आधारे स्वप्नील वासुदेव चौधरी (रा. निंभोरा बु.) यास ताब्यात घेऊन त्याच्या गोडावून व घरातून मोठ्या प्रमाणात चोरीचा माल जप्त करण्यात आला. या टोळीकडून एच.टी.पी. पंप मशिन ५, मोठ्या साईजच्या बॅटऱ्या ११, लहान बॅटऱ्या ३, इन्व्हर्टर मशिन ७, मोटारसायकली ४, पावर ट्रॉली लहान ट्रॅक्टर २, नॅनो कार १, सोलर प्लेट २, मटेरियल बॅग ११, ठिबक नळ्या ३ बंडल तसेच इतर शेती व इलेक्ट्रिक साहित्य असा एकूण १२ लाख रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी मुख्य आरोपी विलास वाघोदे (फरार) याच्यासह एक महिला, गोपाळ भोलनकर, आकाश घोटकर, अर्जुन सोळंकी, जमील तडवी, स्वप्नील चौधरी, राकेश तडवी, ललित पाटील, राहुल ऊर्फ मयुर पाटील अशी १० जणांची टोळी उघड झाली असून त्यांच्याविरुद्ध निंभोरा पोलीस स्टेशनचे ५, यावलचे २, रावेरचे १, मुक्ताईनगरचे १, सावदा पोलीस स्टेशनचा १ असे एकूण १० गुन्हे उघडकीस आले आहेत.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उप विभागीय पोलीस अधिकारी फैजपुर विभाग अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली निंभोरा पोलीस स्टेशनचे हरीदास बोचरे, दिपाली पाटील, ममता तडवी, सुरेश अढायंगे, बिजु जावरे, रिजवान पिंजारी, अविनाश पाटील, किरण जाधव, रशिद तडवी, सर्फराज तडवी, रफिक पटेल, अमोल वाघ, प्रभाकर ढसाळ, प्रशांत चौधरी, महेंद्र महाजन, परेश सोनवणे, भुषण सपकाळे, सुभाष शिंदे, योगेश चौधरी, राहुल केदारे यांच्यासह महिला पोलीस अंमलदारांचा सहभाग होता. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सोपान गोरे, प्रितम पाटील, यशवंत टहाकळे, बबन पाटील, प्रदिप चवरे, प्रदिप सपकाळे, मयुर निकम, सचिन घुगे यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली.
निंभोरा व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी मिळून एकूण १० गुन्हे उघडकीस आणले असून परिसरातील शेतकरी व नागरिकांनी या धडाकेबाज कारवाईचे कौतुक केले आहे. यामुळे नागरिकांच्या मनात पोलीसांविषयी विश्वास व सुरक्षेची भावना दृढ झाली आहे.





