
मोहाडीत धक्कादायक प्रकार : आठ वर्षीय मुलीच्या पायात सापडली पिस्तूलची गोळी
जळगाव (प्रतिनिधी) – मोहाडी (ता. जळगाव) गावात अंगणात खेळत असलेल्या आठ वर्षीय मुलीच्या पायात थेट पिस्तूलची गोळी घुसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या मुलीच्या पायाला सात महिन्यांपूर्वी दुखापत झाली होती. त्यावेळी सिव्हील हॉस्पिटलमध्ये फक्त टाके घालून उपचार करून तिला घरी सोडण्यात आले. मात्र, अलीकडे पाय दुखू लागल्याने खासगी रुग्णालयात तपासणी केली असता पायात गोळी असल्याचे स्पष्ट झाले.
मुलीचे कुटुंबिय तसेच मुलगी स्वतःही गोळी कशी लागली, कोणी मारली याबाबत अनभिज्ञ असल्याचे पोलिस चौकशीत समोर आले आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
घटना अशी की, मुलगी आपल्या मैत्रीणींसह अंगणात खेळत असताना अचानक पायाला दुखापत झाली. रक्तस्त्राव थांबत नसल्याने कुटुंबियांनी तिला प्रथम मोहाडी येथील रुग्णालयात आणि नंतर सिव्हील हॉस्पिटलला दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी फक्त टाके घालून उपचार केला. सात महिन्यांनंतर पाय दुखू लागल्याने आणि बोटे काळी पडू लागल्याने तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. तपासणीत पायात गोळी असल्याचे निदर्शनास आले.
त्यानंतर डॉक्टरांनी पालकांना थेट जिल्हापेठ पोलिस ठाण्यात जाण्याच्या सूचना दिल्या. पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी सुरू करण्यात आली. मात्र, पालकांनी आणि मुलीने या घटनेविषयी काहीच माहिती नसल्याचे सांगितले. दरम्यान, ही घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचे स्पष्ट झाल्याने प्रकरण पुढील तपासासाठी एमआयडीसी पोलिसांकडे वर्ग करण्यात आले.
या प्रकरणामुळे सिव्हील हॉस्पिटलमधील हलगर्जीपणावर देखील प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तातडीने नीट तपासणी झाली असती तर सात महिन्यांपूर्वीच हा प्रकार समोर आला असता. पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली असून, पुढील कारवाईबाबत संकेत दिले आहेत




