खान्देश टाईम्स न्यूज l ०९ ऑगस्ट २०२३ l जकी अहमद l जगात नाती तर खूपच असतात फक्त त्यात मतलबची आणि निस्वार्थी नाती ओळखता यायला हवी. साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ठरवून केलेल्या नातींपेक्षा अचानक गुंफली गेलेली नाती अधिक घट्ट होतात. असचं एक नाते मी आणि हेतलमध्ये गुंफले गेले ते म्हणजे माय-लेकीचे नाते. आमच्या नात्याला अवघे चार वर्ष झाले पण ते फार जुने नाते असल्या सारखं वाटते.
दोघांच्या कुटुंबातील कोणताही सुख-दुःखाचा क्षण असला तरी त्यावर आम्ही एकमेकींशी संवाद साधतो. आजवर आमचे दोन अधिक मास झाले मात्र आम्ही आमचा सासर धर्म जपला आणि मुलगी व जावयांना धोंड्याचे वाण घ्यायला बोलावले. यंदाचा अधिक मास जरा खास होता. आम्ही दोघांना वाण दिल्यावर मलाच एक अनपेक्षित सुखद धक्का बसला. हेतलला आम्ही मुलगी मानले असल्याने तिने देखील तिचे कर्तव्य पार पाडले.
लग्नकार्यात कन्यादानाला अतिशय महत्त्व असते. आपल्या लाडक्या लेकीला सुयोग्य हाती सोपवून तिची जबाबदारी तिच्या पतीच्या हाती सोपवणे, याला कन्यादान विधी म्हणतात. त्याचा चुकीचा अर्थ काढत, कन्या काय दान देण्याची वस्तू आहे का? अशी चर्चा करतात. मात्र तसे नसून, कन्यादान हा एक संस्कार आहे. जबाबदारीची जाणीव आहे. आपण ज्या मुलीला लाडाकोडाने वाढवली, तिची जबाबदारी दुसऱ्याच्या हाती सोपवण्यासाठी आई-वडिलांना कठोर व्हावे लागते. त्यांच्या त्यागामुळे तिला तिचे हक्काचे घर मिळते. त्या कृतज्ञतेची छोेटीशी परतफेड म्हणून विवाहित मुलगी अधिक मासात आपल्या आईची ओटी भरते.
आज हेतलने मला पाटावर बसवून हळदी-कुंकू लावत माझी ओटी भरली. आमची ‘निधी’ आज असती तर तिने देखील आईची ओटी भरली असती. मुलगी म्हणून हेतलने आपली कृतज्ञता व्यक्त केली आणि मला निधीची आठवण झाली. आधुनिक काळात देखील संस्कार आणि नाते जपणारी मंडळी आयुष्यात असल्याने मी धन्य झाले.