
रिक्षा पुढे घेण्याच्या वादातून चालकाला मारहाण, धमकी
जळगाव: रिक्षा पुढे घेण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून सय्यद अक्सर सय्यद इमाम (वय ५५, रा. गेंदालाल मिल) यांना शिवीगाळ आणि बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी एस. के. ऑईल मिलसमोर घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली आहे.
गेंदालाल मिल परिसरात राहणारे सय्यद अक्सर हे रिक्षाचालक आहेत. घटनेच्या दिवशी त्यांनी एस. के. ऑईल मिलजवळील रिक्षा स्टॉपवर रिक्षा उभी केली होती.
संशयिताला त्यांनी रिक्षा पुढे घेण्यास सांगितले, यावरून दोघांमध्ये वाद उफाळला. संशयिताने सय्यद अक्सर यांना शिवीगाळ करीत चापटाबुक्क्यांनी मारहाण केली आणि “इथे रिक्षा लावलीस तर जीव मारून टाकेन” अशी धमकी दिली.
यानंतर सय्यद अक्सर यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रदीप पाटील तपास करत आहेत.





