
रिक्षात प्रवाशाची २५ हजार रुपयांची रोकड चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; एकाला अटक
एलसीबीच्या पथकाची कारवाई ; अन्य फरार दोघांचा शोध सुरु
भुसावळ (प्रतिनिधी) : रिक्षात बसलेल्या प्रवाशाच्या खिशातील २५ हजार रुपये चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून ३ हजार रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा एकूण १ लाख ५३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दिनांक १९ सप्टेंबर रोजी फिर्यादी सद्दाम हुसेन बागवान (रा. भुसावळ) यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवली की, दि. १८ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता ते जळगाव येथून रिक्षाने भुसावळला येत असताना रिक्षात बसलेल्या दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या खिशातील २५ हजार रुपये रोख चोरले. यावरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात सीसीटीएनएस गु.र.नं. ६६९/२०२५, भा.दं.वि. कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल आणि त्यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत आरोपी शोयब हमीद खान (वय २५, रा. शाहूनगर, भिस्ती मोहल्ला, जळगाव) याला ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देताना सांगितले की, त्याने हा गुन्हा प्रधुम्न उर्फ बंटी नंदू महाले (रा. खंडेराव नगर, जळगाव) आणि टोनी (पूर्ण नाव माहित नाही, रा. पिंप्राळा) यांच्यासह केला. त्याच्याकडून त्याच्या हिस्स्याचे ३ हजार रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली प्रवासी रिक्षा असा एकूण १ लाख ५३ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. इतर दोन साथीदार फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.
आरोपी शोयब खान याने जळगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतही अशाच प्रकारे गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. ताब्यात घेतलेला आरोपी आणि मुद्देमाल पुढील तपासासाठी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला असून, तपास सुरू आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यात पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सफौ अतुल वंजारी, पोहेकॉ अक्रम शेख, विजय पाटील, उमाकांत पाटील, प्रवीण भालेराव, मुरलीधर धनगर, पोना किशोर पाटील, पोकॉ प्रशांत परदेशी, रवींद्र कापडणे, तसेच तांत्रिक सहाय्यक पोकॉ पंकज खडसे, गौरव पाटील आणि मिलिंद जाधव यांनी सहभाग घेतला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे वरिष्ठांनी कौतुक केले आहे.





