
बसस्थानक परिसरात न्यायालयीन कर्मचाऱ्याचा २५ हजारांचा मोबाईल लंपास
जळगाव : शहरातील नवीन बसस्थानक परिसरात शनिवारी सकाळी न्यायालयीन कर्मचाऱ्याच्या खिशातून २५ हजार ५०० रुपये किंमतीचा महागडा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश दयाराम बिरहारी (वय ४०, रा. राणीचे बांबरूड, ता. पाचोरा) हे न्यायालयात नोकरीस असून शनिवारी (२७ सप्टेंबर) सकाळी आठच्या सुमारास बसस्थानक परिसरात आले होते. त्यावेळी त्यांच्या खिशातील २५ हजार ५०० रुपयांचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. घटनेनंतर त्यांनी सर्वत्र शोध घेतला मात्र काहीच हाती लागले नाही.
अखेर त्यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रदीप पाटील करीत आहेत.





