
सारोळा बु येथील महसूल अधिकारी आशिष काकडे निलंबित; शेतकरी अनुदान घोटाळ्यावरून प्रशासनाची तातडीची कारवाई
पाचोरा प्रतिनिधी तालुक्यातील सारोळा बु येथील महसूल अधिकारी आशिष काकडे यांच्यावर शिस्तभंगाच्या गंभीर तक्रारी आल्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ३० सप्टेंबर रोजी त्यांना तत्काळ प्रभावाने निलंबित केले. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून, चौकशी आदेशित केली आहे.
तहसीलदार विजय बनसोडे यांनी १७ सप्टेंबर रोजी सादर केलेल्या अहवालात शेतकरी अनुदान फायलींची अयोग्य हाताळणी, नियमांचे उल्लंघन आणि अधिकारांचा गैरवापर केल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी १३ दिवसांतच निलंबनाचा आदेश काढला. काकडे यांचे मुख्यालय धरणगाव तहसील कार्यालय निश्चित करण्यात आले असून, चौकशीसाठी आवश्यक कागदपत्रे सात दिवसांत जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली असून, शेतकरी संघटनांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तपास अपूर्ण असताना घाईघाईत घेतलेल्या निर्णयामागे राजकीय व प्रशासकीय दबाव असल्याची चर्चा रंगली आहे. शेतकरी संघटनांनी सत्य बाहेर यावे आणि दोषींवर कारवाई व्हावी यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे.





