
जळगाव RTO मधील लेखाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप ; दिपककुमार गुप्ता यांची तक्रार
जळगाव प्रतिनिधी प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय (RTO), जळगाव येथील लेखाधिकारी सतीश महाजन यांच्याविरुद्ध गंभीर आरोप करण्यात आले असून तात्काळ निलंबन व विभागीय चौकशीची मागणी करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार प्रशिक्षक दीपककुमार पी. गुप्ता यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या आयुक्तांना दिलेल्या लेखी तक्रारीत हे आरोप नमूद केले आहेत.
तक्रारीत म्हटले आहे की, संबंधित अधिकाऱ्यांनी स्वतःच्या खासगी वाहनावर “HRSS अध्यक्ष, हिंदू राष्ट्र सेवा संघ” असा प्रचारक संदेश लावला असून हे शासकीय सेवक आचारसंहितेचे उल्लंघन आहे. तसेच सदर गाडीचे इन्शुरन्स व प्रदूषण तपासणी प्रमाणपत्र कालबाह्य असूनही वाहन RTO कार्यालय परिसरात वापरले जात असल्याचा आरोप आहे.
याशिवाय अधिकारी वारंवार कार्यालयीन वेळेत अनुपस्थित राहतात, हजेरी नोंदवत नाहीत आणि फिंगरप्रिंट हजेरी यंत्र बसवलेले नाही, अशाही तक्रारी करण्यात आल्या आहेत. गुप्ता यांनी सात दिवसांत कठोर कारवाई न झाल्यास लोकायुक्त कार्यालय, मुख्यमंत्री कार्यालय व न्यायालयाकडे प्रकरण धरण्याचा इशारा दिला आहे. या तक्रारीनंतर विभागीय पातळीवर काय कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





