
जळगावचे नवे जिल्हाधिकारी रोहन घुगे; आयुष प्रसाद यांची नाशिकला बदली
जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची नाशिक जिल्ह्यात बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे हे जळगावचे नवे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त झाले आहेत. राज्य शासनाने मंगळवारी (७ ऑक्टोबर) पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याचे आदेश निर्गमित केले आहेत.
आयुष प्रसाद यांनी जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार सांभाळत असताना जिल्ह्यातील प्रशासन अधिक गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या कार्यकाळात “शंभर दिवसांचा कृती आराखडा” हा उपक्रम प्रभावीपणे राबवण्यात आला होता. या उपक्रमातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचा सन्मान स्वतःचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला होता.
जिल्ह्याच्या अर्थविकास आणि पायाभूत सुविधा उभारणीसाठी प्रसाद यांनी ठोस निर्णय घेतले. मात्र, काही सरकारी कार्यक्रम आणि जनसंपर्क उपक्रमांमध्ये मंत्री व आमदारांसोबत कमी सहभागाबाबत त्यांच्या कार्यशैलीवर चर्चा झाल्याचे सूत्रांकडून समजते.
दरम्यान, नव्याने नियुक्त होणारे जिल्हाधिकारी रोहन घुगे हे ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. प्रशासकीय कार्यकौशल्य, समन्वयक दृष्टीकोन आणि विकास योजनांवरील अंमलबजावणी यासाठी त्यांची ख्याती आहे. लवकरच ते जळगाव जिल्ह्याचा कार्यभार स्वीकारतील.





