खान्देशगुन्हेजळगांवसामाजिक

बंदुकीचा धाक दाखवून तीन पेट्रोल पंपांवर सशस्त्र दरोडा

बंदुकीचा धाक दाखवून तीन पेट्रोल पंपांवर सशस्त्र दरोडा

१ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज लंपास

मुक्ताईनगर प्रतिनिधी – मुक्ताईनगर शहराला लागून असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास सशस्त्र दरोडेखोरांनी थैमान घातले. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपासह आणखी दोन पेट्रोल पंपांवर दरोडा टाकून चोरट्यांनी सुमारे १ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनांमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

प्रथम दरोडा मुक्ताईनगरलगतच्या रक्षा पेट्रोलियम या पंपावर टाकण्यात आला. पाच अज्ञात इसम मोटारसायकलवरून येऊन बंदुकीचा धाक दाखवत कर्मचाऱ्यांना मारहाण केली. केबिनमधील कॉम्प्युटर, सीसीटीव्ही यंत्रणा आणि इतर उपकरणांची तोडफोड करून सीसीटीव्ही डीव्हीआर घेऊन दरोडेखोर पसार झाले. या घटनेत कर्मचारी दिलीप रमेश खोसे (रा. पिंपरी राऊत) यांनी फिर्याद दिली असून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ करत आहेत.

यानंतर चोरट्यांनी मनुभाई आशीर्वाद पेट्रोल पंप (कर्की फाटा, ता. मुक्ताईनगर) आणि त्यानंतर सय्यद पेट्रोल पंप (तळवेल फाटा, वरणगाव शिवार, ता. भुसावळ) येथे दरोडा घातला. या दोन्ही ठिकाणी देखील रोख रक्कम व सीसीटीव्हीचे डीव्हीआर चोरट्यांनी चोरून नेले.

दरोड्यात  रोख १ लाख रुपये, मोबाईल (रेडमी, मोटोरोला, आयक्यू) ११ हजार रुपये, सीसीटीव्ही डीव्हीआर ६,५०० रुपये, तसेच इतर किरकोळ रक्कम मिळून एकूण १ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज असा आहे.

घटनेनंतर पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण आव्हाड आणि संदीप कुमार गावित यांनी घटनास्थळांची पाहणी केली. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या पंपावरील कर्मचारी दिलीप खोसे व प्रकाश माळी यांना दरोडेखोरांनी मारहाण करून केबिनमध्ये कोंडल्याची माहिती समोर आली आहे.

दरोडेखोर घटनांनंतर वरणगावच्या दिशेने दुचाकीवरून पसार झाले असून मुक्ताईनगर आणि वरणगाव पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. या तिहेरी दरोड्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button