
चाळीसगावात दुचाकी, पाणबुडी मोटार चोरीचा पर्दाफाश; तिघांना अटक
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) चाळीसगाव आणि नाशिक जिल्ह्यातील शेतांमधून होणाऱ्या दुचाकी आणि पाणबुडी मोटार चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत तिघा सराईत चोरट्यांना अटक केली आहे. अटकेतील आरोपींनी तब्बल २९ पाणबुडी मोटारी चोरल्याची कबुली दिली आहे. पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत या कारवाईची माहिती दिली.
चाळीसगाव तालुक्यातील हातगाव येथून एक दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंदवली गेली होती. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या पथकाने संशयावरून पोलिसांनी सोमनाथ उर्फ लंगड्या रघुनाथ निकम (रा. अंधारी, ता. चाळीसगाव) , सुधीर नाना निकम (रा. महारवाडी, ता. चाळीसगाव) ,सम्राट रविंद्र बागुल (रा. महारवाडी, ता. चाळीसगाव)या तिघांना अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता आरोपींनी सुरुवातीला ११ पाणबुडी मोटारी चोरल्याची कबुली दिली. पुढील तपासात त्यांनी चाळीसगाव आणि नाशिक जिल्ह्यातील विविध शेतांमधून एकूण २९ मोटारी चोरल्याचे उघड झाले. आरोपी या मोटारी चोरून स्वतःच्या मालकीच्या असल्याचे भासवत विक्री करत असल्याचे समोर आले.
पोलिस पथकाची कामगिरी
या यशस्वी कारवाईत चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक शशिकांत पाटील, उपनिरीक्षक शेखर डोमाळे आणि कर्मचारी युवराज नाईक, महेश पाटील, भुषण शेलार, सागर पाटील, बाबासाहेब पाटील, गणेश चव्हाण, दीपक नरवाडे, संदीप पाटील, तुकाराम चव्हाण आणि विजय पाटील यांनी मोलाचा सहभाग नोंदवला.
चाळीसगाव आणि नाशिक जिल्ह्यातील नांदगाव परिसरातील ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून पाणबुडी मोटारी चोरीला गेल्या असतील, त्यांनी आपली ओळख सिद्ध करून चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यातून त्या परत घ्याव्यात, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
या कारवाईमुळे ग्रामीण भागातील शेतकरी वर्गात मोठा दिलासा निर्माण झाला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या तत्परतेमुळे शेतकऱ्यांमधील असुरक्षिततेची भावना कमी झाली असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.





