खान्देशगुन्हेजळगांव

पोलिसांच्या हातावर तुरी देऊन दोन गुरे चोर पळाले ! 

पोलिसांच्या हातावर तुरी देऊन दोन गुरे चोर पळाले ! 

अमळनेर तालुक्यातील घटना

अमळनेर (प्रतिनिधी) :

जिल्ह्यातील अमळनेर आणि जामनेर तालुक्यातील परिसरांमधून गुरे चोरणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली होती. पी मात्र चौघांना पोलिसांनी चौकशी करिता नेत असताना यातील दोघे पोलिसांच्या वाहनातून पसार झाल्याची घटना मंगळवारी (दि. २२ ऑक्टोबर) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास कुऱ्हे रेल्वे अंडरपास परिसरात घडली. या घटनेमुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.

लोणे व पिंपळे परिसरातून सात गुरे चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक  संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, हरीलाल पाटील व राहुल कोळी — तपास करीत होते. सीसीटीव्ही फुटेजमधून जवखेडे परिसरात संशयास्पद दुचाकी (एमएच १९ बीबी ५१९८) आढळली. या दुचाकीच्या मालकाची माहिती घेतल्यावर अकील कादिर पिंजारी (रा. आझाद नगर, पिंप्राळा, जळगाव) असे समोर आले. पोलिसांनी त्याला २२ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्याने आपल्या साथीदारांची नावे सांगितली  शाकीर शाह अरमान शाह (वय ३०, रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव), अमजद शेख फकीर कुरेशी (वय ३५, रा. मेहरूण), आफताब आलम शेख रहीम (रा. नशिराबाद) आणि तौसिफ शेख नबी (रा. फातिमा नगर, जळगाव). या टोळीने अमळनेर तालुक्यातील सात आणि पहुर येथील तीन गुरे चोरल्याचे कबूल केले. चोरीसाठी त्यांनी पिकअप वाहन (एमएच १९ सीव्ही ७१६९) वापरल्याचेही उघड झाले.

चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले, तर पाचवा साथीदार तौसिफ शेख नबी घरात आढळला नाही. यातील चार संशयितांना स्पॉट व्हेरिफिकेशनसाठी अमळनेर येथे आणण्यात आले असताना, रात्री कुऱ्हे रेल्वे अंडरपासजवळ पोलिसी वाहन थांबवण्यात आले. त्याच वेळी मागील सीटवर बसवलेले आरोपी  शाकीर शाह अरमान शाह आणि अमजद शेख फकीर कुरेशी — हे दोघे बेड्या तोडून खाली उतरले आणि अंधाराचा फायदा घेत शेतामध्ये पळून गेले.

घटनेनंतर पोलिसांनी परिसरात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली, परंतु आरोपींचा थांगपत्ता लागलेला नाही. उर्वरित दोन आरोपींना पोलिसांनी अमळनेर पोलीस ठाण्यात जमा केले असून, फरार आरोपींच्या शोधासाठी प्रयत्न सुरू आहेत.

या प्रकरणात दोघा फरार आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 262 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button