
उच्चशिक्षित तरुणाची शेतात गळफास घेऊन आत्महत्या
चिंचखेडा येथील धक्कादायक घटना
जामनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील चिंचखेडा (तपोवन) येथील एका २२ वर्षीय उच्चशिक्षित तरुणाने स्वतःच्या शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेने गावात शोककळा पसरली असून जामनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मयत तरुणाचे नाव शेखर श्रीराम पाटील (वय २२, रा. चिंचखेडा, ता. जामनेर) असे आहे. शेखरने बी.एस्सी.पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून शेती व्यवसाय हाती घेतला होता. अभ्यासू, शांत आणि कर्तबगार म्हणून तो परिसरात ओळखला जात होता. शनिवारी सकाळी तो नेहमीप्रमाणे शेतात गेला होता, मात्र बराच वेळ झाला तरी तो घरी परतला नाही. नातेवाईकांनी शोध घेतला असता शेतातील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी पोलिसांना कळवले. जामनेर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह उपजिल्हा रुग्णालय, जामनेर येथे शवविच्छेदनासाठी हलविला.
आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून पोलिसांनी याबाबत पुढील तपास सुरू केला आहे. शेखरच्या निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण चिंचखेडा (तपोवन) गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.





