
प्रशासकीय इमारतीत लाजिरवाणा प्रकार; स्वच्छतागृहात कंडोम आढळल्याने खळबळ
प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी : राष्ट्रीय जनमंच पक्षाची मागणी
चाळीसगाव प्रतिनिधी : तालुक्याच्या प्रशासकीय इमारतीत घडलेल्या लाजिरवाण्या घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. तहसील कार्यालय, भूमी अभिलेख, कृषी विभाग, सहाय्यक निबंधक अशा विविध सरकारी विभागांची कार्यालये असलेल्या या इमारतीत दुसऱ्या मजल्यावरील स्वच्छतागृहात वापरलेला कॉन्डोम आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने केवळ प्रशासनातील शिस्तीवरच नाही, तर सरकारी कार्यालयांच्या नैतिकतेवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
जनतेच्या कामांसाठी दररोज शेकडो नागरिक, शेतकरी, महिला, विद्यार्थी या इमारतीत ये-जा करतात. अशा सार्वजनिक आणि अधिकृत ठिकाणी अशोभनीय कृत्यांचे चिन्ह सापडणे म्हणजे सुरक्षेच्या आणि शिस्तीच्या बाबतीत झालेली गंभीर ढिलाई असल्याचे स्पष्ट होते. कार्यालयात कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही हा प्रकार अत्यंत चिंताजनक मानला जात आहे.
या प्रकरणी राष्ट्रीय जनमंच पक्षाने प्रशासनाकडे तीव्र संताप व्यक्त केला आहे. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संदीप दादा लांडगे यांनी निवेदनाद्वारे म्हटले आहे की, “जनतेच्या कराच्या पैशातून उभी केलेली ही प्रशासकीय इमारत म्हणजे लोकशाहीचा आरसा आहे. त्या ठिकाणी अशा अपवित्र प्रकारांनी संपूर्ण तालुक्याचे मस्तक लज्जेने झुकवले आहे. प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई केली नाही, तर राष्ट्रीय जनमंच पक्ष रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभारेल.”
लांडगे यांनी पुढे म्हटले आहे की, या घटनेची केवळ चौकशी न करता संबंधित कार्यालयांतील शिस्त आणि सुरक्षा व्यवस्थेत ठोस सुधारणा करणे गरजेचे आहे. अन्यथा जनतेचा सरकारी यंत्रणांवरील विश्वास डळमळीत होईल. “प्रशासन जागे व्हा — नाहीतर जनता जागवेल,” असा इशाराही त्यांनी दिला आहे.
या लाजिरवाण्या प्रकारानंतर प्रशासनाकडून कोणती प्रतिक्रिया येते आणि चौकशीची दिशा कोणती घेतली जाते, याकडे आता तालुक्याचे लक्ष लागले आहे.





