पाचोरा ;– मागील काही दिवसांपासुन पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन व आमदार किशोर पाटील यांच्यात एका बातमीच्या शीर्षकावरून वाद निर्माण झाला होता. या वादात किशोर पाटील यांनी पत्रकार संदीप महाजन यांना अत्यंत खालच्या थरात आई – बहिणी वरून केलेली शिवीगाळ ही एका लोकप्रतिनिधीला निश्चितच शोभणारी नव्हती. एवढ्यावर न थांबता आमदारांनी स्वतः केलेल्या शिवीगाळचे समर्थन देखील केले. या वादाचा कळस म्हणून काल दुपारी पत्रकार संदीप महाजन यांच्यावर झालेल्या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ बघितल्याने समाजमन सुन्न झाले आहे. या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत असल्याची माहिती भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी शहर अध्यक्ष रमेश वाणी, ओ.बी.सी. आघाडी जिल्हा सरचिटणीस प्रदिप पाटील, शहर सरचिटणीस दिपक माने, कुऱ्हाड – लोहारा गट प्रमुख जगदिश तेली, तालुका सरचिटणीस संजय पाटील, पंचायत समितीचे मा. सभापती बन्सीलाल पाटील उपस्थित होते.
मतदार संघाचा प्रथम नागरिक असलेल्या व्यक्तीने स्वतः आणि स्वतःच्या कार्यकर्त्यांकडून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर सुरू केलेले हे असले अशोभनीय प्रकार यापूर्वी पाचोरा-भडगाव मध्ये कधीही घडलेले नव्हते.येथील प्रत्येक नागरिकाची आई-बहीण ही लोकप्रतिनिधी म्हणून मिरवणाऱ्या प्रत्येकाची आई बहीण आहे.पत्रकाराच्या आई बहिणीला अशा पद्धतीने केलेली शिवीगाळ व मारहाणीचा भाजप पाचोरा-भडगाव याचा तीव्र निषेध करीत असल्याचे पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
पत्रकार संदीप महाजन हे ३० वर्षापासून पत्रकारितेत आहेत विशेषतः ते स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्य आहेत.आणि काल ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनी एखाद्या स्वातंत्र्यसैनिकाच्या मुलाला अशी मारहाण करणे हे खूप निंदनीय आहे. विधिमंडळ सभागृहाचा सदस्य म्हणून त्या पदाची प्रतिमा,प्रतिष्ठा आणि मर्यादा सांभाळणे प्रत्येक आमदाराचे कर्तव्य आहे. मात्र आमदारांनी दिलेल्या अश्लील शिव्या आणि आता गुंडांच्या कडून पत्रकाराला केलेली मारहाण ही पाचोरा भडगाव सारख्या सुसंस्कृत व सभ्य तालुक्यावर काळीमा फासणारी घटना आहे. पाचोरा व भडगाव मतदार संघात भर दिवसा आणि भर रस्त्यावर अशी मारहाण आजपर्यंत कुणीही बघितलेली नव्हती. त्यामुळे येथील व्यापाऱ्यांसह जनमानसात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.सत्ता, संपत्ती आणि अधिकाराच्या बळावर पोसलेली गुंडशाही इथला समाज कधीही सहन करून घेणार नाही. तरी भारतीय जनता पार्टीच्या वतीने या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो.