खान्देशजळगांव

जळगाव मनपा निवडणुकीत महायुतीचा ‘विजयी षटकार’; प्रभाग ७ ‘क’ मधून भाजपचे विशाल भोळे बिनविरोध

जळगाव मनपा निवडणुकीत महायुतीचा ‘विजयी षटकार’; प्रभाग ७ ‘क’ मधून भाजपचे विशाल भोळे बिनविरोध

जळगाव | प्रतिनिधी जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीने आपला वरचष्मा कायम राखला असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी विजयाचा ‘षटकार’ लगावला आहे. प्रभाग क्रमांक ७ ‘क’ मधून भाजपचे उमेदवार विशाल सुरेश भोळे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. या ताज्या यशामुळे ७५ जागांच्या महापालिकेत महायुतीचे आतापर्यंत ६ उमेदवार बिनविरोध निवडून आले असून, यात शिवसेना (शिंदे गट) ४ तर भाजपच्या २ उमेदवारांचा समावेश आहे.

महापालिकेच्या ७५ जागांसाठी आज, २ जानेवारी रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती. या प्रक्रियेत राजकीय पक्षांनी साम, दाम, दंड, भेदाचा वापर करत प्रतिस्पर्धी उमेदवारांची माघार घडवून आणण्यासाठी जोर लावला होता. शेवटच्या दिवशी विशाल भोळे यांच्या विरोधातील उमेदवारांनी माघार घेतल्याने त्यांच्या विजयाची अधिकृत घोषणा करण्यात आली. या निवडीचे वृत्त समजताच भाजप कार्यकर्त्यांनी महापालिका प्रांगणात गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.

बिनविरोध विजयाचा ‘षटकार’ असा रंगला: १. उज्ज्वला मोहन बेंडाळे (भाजप): प्रभाग १२ (ब) मधून माजी महानगराध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे यांनी महायुतीचे खाते उघडले होते. २. डॉ. गौरव सोनवणे (शिवसेना शिंदे गट): प्रभाग १८ (अ) मधून आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे सुपुत्र डॉ. गौरव सोनवणे बिनविरोध झाले. ३. मनोज चौधरी (शिवसेना शिंदे गट): प्रभाग ९ (अ) मधून त्यांची निवड निश्चित झाली. ४. प्रतिभा देशमुख (शिवसेना शिंदे गट): प्रभाग ९ (ब) मधून अपक्ष उमेदवाराने माघार घेतल्याने यांचा विजय झाला. ५. रेखा चुडामण पाटील (शिवसेना शिंदे गट): प्रभाग १९ (अ) मधून आज शिवसेनेची चौथी जागा बिनविरोध झाली. ६. विशाल सुरेश भोळे (भाजप): प्रभाग ७ (क) मधून विशाल भोळे यांनी महायुतीसाठी सहावा विजय खेचून आणला.

महायुतीची जोरदार आघाडी: निवडणुकीचे मतदान होण्यापूर्वीच ६ जागांवर विजय मिळवल्याने महायुतीच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि भाजप नेत्यांच्या रणनीतीला मोठे यश मिळाल्याचे मानले जात आहे. आता उर्वरित ६९ जागांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान पार पडणार असून, या बिनविरोध विजयांचा मतदानावर काय परिणाम होतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button