
जळगावात महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार शुभारंभ ; आज पिंप्राळ्यात रवींद्र चव्हाण यांची तोफ धडाडणार!
७५ उमेदवारांच्या विजयासाठी भवानी मंदिर परिसरातून फुंकले जाणार रणशिंग; दिग्गज नेत्यांची उपस्थिती
जळगाव (प्रतिनिधी): जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून, महायुतीने आपल्या विजयाचा निर्धार पक्का केला आहे. आज, रविवार दि. ४ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता पिंप्राळा उपनगरात भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभा होणार आहे. याच सभेतून महायुतीच्या ७५ उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडून अधिकृत शुभारंभ केला जाणार आहे.
भवानी मातेचा आशीर्वाद घेऊन प्रचाराचा प्रारंभ प्रचाराची सुरुवात पिंप्राळा येथील भवानी मंदिर परिसरातून होणार असून, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भव्य जाहीर सभा पार पडणार आहे. या सभेद्वारे महायुती आपली शक्ती दाखवण्यासाठी सज्ज झाली असून, यात भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या मित्रपक्षांचे सर्व उमेदवार व पदाधिकारी सहभागी होणार आहेत.
दिग्गज नेत्यांची मांदियाळी या सभेला महायुतीतील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. यात प्रामुख्याने:
भाजपचे संकटमोचक ना. गिरीशभाऊ महाजन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील केंद्रीय मंत्री ना. रक्षाताई खडसे आमदार सुरेश (राजू मामा) भोळे, आ. अनिल पाटील, आ. मंगेश चव्हाण, आ. संजय सावकारे, आ. चंद्रकांत पाटील
खासदार स्मिताताई वाघ, माजी मंत्री गुलाबराव देवकर, चंद्रकांत सोनवणे, किशोर अप्पा पाटील, अमोल दादा जावळे यांसह अनेक वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे.
कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भाऊ भंगाळे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष संजय पवार आणि आरपीआय (आठवले गट) जिल्हाध्यक्ष अनिल अडकमोल यांनी या ऐतिहासिक सभेच्या तयारीचा आढावा घेतला आहे. महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जळगावकर नागरिकांनी या जाहीर सभेला विक्रमी संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महायुतीतर्फे करण्यात आले आहे.





