
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उद्या जळगावात भव्य रोड शो !
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीने निर्णायक आघाडी घेण्याच्या दृष्टीने प्रचाराचा वेग वाढवला असून, या पार्श्वभूमीवर उद्या मंगळवार, दि. ६ जानेवारी रोजी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचा भव्य रोड शो जळगाव शहरात आयोजित करण्यात आला आहे. या रोड शोमुळे महायुतीच्या प्रचाराला नवी उर्जा मिळणार असून, शहराच्या राजकीय वातावरणात प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे.
हा रोड शो दुपारी ठीक ३ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून सुरू होणार असून, तो नेहरू चौक – लालबहादूर शास्त्री टॉवर – चित्रा चौक – गोलाणी मार्केट या प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करीत पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथेच समारोपाला येणार आहे. या मार्गावर मुख्यमंत्री फडणवीस नागरिकांशी थेट संवाद साधत महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आवाहन करणार आहेत.
महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या महायुतीने एकत्र येत ताकद दाखवली आहे. या रोड शोमध्ये महायुतीचे सर्व ७५ उमेदवार, प्रमुख नेते, पदाधिकारी तसेच हजारो कार्यकर्ते सहभागी होणार असून, जळगाव शहरात शक्तिप्रदर्शनाचे दृश्य पाहायला मिळणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा रोड शो म्हणजे केवळ प्रचार नव्हे, तर जळगावकरांसाठी विकासाचा विश्वास आणि भविष्यातील शहराच्या प्रगतीचा संकल्प असल्याचे महायुतीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. शहरातील व्यापारी, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्यात या रोड शोबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली असून, मार्गावर ठिकठिकाणी स्वागताची तयारी सुरू आहे.
महायुतीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व जळगावकर नागरिकांनी या ऐतिहासिक रोड शोला मोठ्या संख्येने उपस्थित राहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला भक्कम पाठिंबा द्यावा, असे आवाहन मनोज भांडारकर, भाजप जिल्हा प्रसिद्धी प्रमुख (जळगाव जिल्हा महानगर) यांनी केले आहे.





