निधनजळगांव

आरटीओ ट्रॅकवर कामगाराचा चक्कर येऊन अचानक मृत्यू

आरटीओ ट्रॅकवर  कामगाराचा चक्कर येऊन अचानक मृत्यू

खान्देश टाइम्स न्यूज l जकी अहमद l ०५ मार्च २०२६ l जळगाव l शहरातील आरटीओ कार्यालय परिसरात काम करणाऱ्या एका एजंटचा अचानक मृत्यू झाल्याची घटना दुपारी घडली. चक्कर येऊन खाली कोसळल्याने अफसर खान अजमल खान (वय ४१, रा. मिल्लत नगर, फैजपूर, ता. रावेर, जि. जळगाव) यांचे दुर्दैवी निधन झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, अफसर खान अजमल खान यांना सुमारे वर्षभरापूर्वी ब्रेन हॅमरेजचा झटका आला होता. त्यानंतरही ते ६ महिन्यांनी जळगाव येथील आरटीओ कार्यालयातील वाहन चाचणी ट्रॅकवर काम करत होते. गुरुवारी दुपारी ते नेहमीप्रमाणे ट्रॅकवर वाहन काढण्यासाठी आले असता त्यांना अचानक चक्कर येऊ लागली. त्यानंतर त्यांना उलटी झाली आणि काही क्षणांतच ते जागेवर कोसळले.

या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी व सहकाऱ्यांनी तातडीने त्यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

अफसर खान यांच्या अकस्मात निधनाने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा तसेच आई-वडील असा परिवार आहे. परिसरात त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button