
मालेगावजवळ भीषण अपघात; मुक्ताईनगरातील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
चार वर्षांच्या चिमुकल्याचा समावेश; तिघे गंभीर जखमी
उमराणे (जि. नाशिक) / मुक्ताईनगर : प्रतिनिधी मालेगावजवळील राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात चार वर्षांच्या चिमुकल्यासह एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला, तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले. मृत व जखमी सर्वजण सातोड (ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) येथील रहिवासी आहेत.
या अपघातात चालक दीपक किशोर नाफडे (वय ३५), त्यांचा मुलगा प्रथमेश दीपक नाफडे (वय ४) आणि अंकिता संजय नाफडे (वय १९) यांचा जागीच मृत्यू झाला. तर संजय पांडुरंग नाफडे (वय ५०), चारुलता संजय नाफडे आणि पूजा दीपक नाफडे (वय ३०) हे गंभीर जखमी झाले आहेत.
नाशिककडून सातोडच्या दिशेने येत असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन धडकली आणि त्यानंतर पलटी झाली. या भीषण धडकेत तिघांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच चिंचवे व उमराणे येथील रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना तातडीने मालेगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. देवळा पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
नाफडे कुटुंबीयांचे मूळ गाव सातोड असून ते गेल्या काही वर्षांपासून नाशिक येथे वास्तव्यास होते. होळी उत्सवानिमित्त देवदर्शनासाठी ते सर्वजण गावी येत असताना हा दुर्दैवी अपघात झाला.
घटनेची माहिती मिळताच सातोड गावातील ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेतली. मृतदेह अंत्यसंस्कारासाठी सातोड येथे आणण्याची तयारी सुरू असून जखमींवर उपचार सुरू आहेत.





