
रमजानमध्ये सुकामेव्याला मागणी वाढली; युद्धामुळे दरात उसळी
बाजारपेठा बहरल्या; खजूर, अंजीर, पिस्ता, बदामाची खरेदी वाढली
जळगाव : पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठांमध्ये सुकामेव्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू असून विविध प्रकारच्या सुकामेव्याला चांगली मागणी निर्माण झाली आहे. रोजा (उपवास) सोडताना खजूर व इतर सुकामेवा खाण्याची परंपरा असल्यामुळे या काळात बाजारपेठेत ग्राहकांची विशेष गर्दी पाहायला मिळत आहे. यंदा रमजानच्या सुरुवातीला सुकामेव्याचे दर तुलनेने स्थिर होते, मात्र अमेरिका, इराण तसेच आखाती देशांमधील सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे आयात प्रभावित होऊन काही प्रकारच्या सुकामेव्याच्या किमतींमध्ये वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
रमजान महिन्यात मुस्लीम बांधवांकडून दिवसभर उपवास केल्यानंतर इफ्तारच्या वेळी खजूर आणि सुकामेव्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे या काळात बाजारात सुकामेव्याला विशेष मागणी असते. ग्राहकांची ही वाढती मागणी लक्षात घेऊन व्यापाऱ्यांनी विविध प्रकारचा सुकामेवा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून दिला आहे. खजूर, अंजीर, जर्दाळू, पिस्ता, मामरा बदाम यांसारखे सुकामेवे प्रामुख्याने इराणमधून आयात केले जातात, तर साधा बदाम अमेरिकेतून आयात केला जातो.
यंदा बाजारात विविध प्रकारचे खजूर उपलब्ध असून त्यांच्या किमतींमध्ये काही प्रमाणात वाढ दिसून आली आहे. युद्ध सुरू होण्यापूर्वी सुमारे १६० रुपये प्रति किलो असलेले लाल खजूर आता १८० रुपयांवर पोहोचले आहेत. तर काळ्या खजुरांचे दर २०० ते ७०० रुपयांवरून २१० ते ७२० रुपये प्रति किलोपर्यंत वाढले आहेत. त्याचप्रमाणे अंजीर, पिस्ता, मामरा बदाम आणि साध्या बदामांच्या किमतींमध्येही वाढ झाल्याचे बाजारात दिसून येत आहे.
रमजानच्या पार्श्वभूमीवर खजूर, काजू, बदाम, बेदाणा, चारोळी, पिस्ता, अंजीर, अक्रोड, केशर तसेच खोबरे या सुकामेव्यांच्या प्रकारांना मोठी मागणी आहे. विशेषतः इफ्तारसाठी लागणाऱ्या खजूर आणि बदामांच्या खरेदीत वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुरुवातीला दर स्थिर होते; मात्र आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम आता बाजारपेठेवर दिसू लागला असून काही सुकामेव्यांच्या दरात वाढ झाली आहे.
व्यापाऱ्यांच्या मते, सध्या बाजारात सुकामेव्याचा पुरवठा चांगला असला तरी आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे आयात खर्च वाढत आहे. त्यामुळे आगामी काळात सुकामेव्याच्या किमतींमध्ये आणखी चढ-उतार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांकडून सध्या मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जात असल्याचेही व्यापाऱ्यांनी सांगितले.





