अनधिकृत होर्डिंग प्रकरणी भंगाळे गोल्डला पुन्हा दंड

अनधिकृत होर्डिंग प्रकरणी भंगाळे गोल्डला पुन्हा दंड
तीन दिवसांत दंड न भरल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा
जळगाव : शहरातील अनधिकृत होर्डिंगच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा कारवाई करण्यात आली असून भंगाळे गोल्ड या आस्थापनाला ६० हजार १८० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तीन दिवसांच्या आत हा दंड न भरल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची अंतिम नोटीसही बजावण्यात आली आहे.
यापूर्वी शहरातील सुप्रसिद्ध हॉटेल रूपालीच्या बाहेरील अनधिकृत होर्डिंग तसेच एलईडी स्क्रीनचा मुद्दा चांगलाच गाजला होता. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांनी थेट तक्रार करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यांच्या पाठपुराव्यानंतर संबंधित हॉटेल मालकांवर कारवाई करत ६० हजार १८० रुपयांचा दंड आकारण्यात आला होता.
दरम्यान, शहरातील कालिंका माता परिसर तसेच मेहरूण येथील नमस्कार लॅमिनेट परिसरात उभारण्यात आलेली तीन होर्डिंग अनधिकृत असल्याची बाबही ॲड. पियुष पाटील यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यांच्या तक्रारीनंतर मनपा प्रशासनाने तपासणी करून भंगाळे गोल्ड या आस्थापनाला पुन्हा ६० हजार १८० रुपयांचा दंड ठोठावला आहे.
या संदर्भात भंगाळे गोल्डच्या संचालकांना दंड भरण्याबाबत नोटीस देण्यात आली होती. मात्र दिलेल्या मुदतीत दंड न भरल्यामुळे आता त्यांना तीन दिवसांची अंतिम मुदत देत अंतिम नोटीस बजावण्यात आली आहे. या मुदतीत दंड न भरल्यास पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सामाजिक कार्यकर्ते ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील यांनी सांगितले की, सर्वसामान्य हॉकर्स, अतिक्रमणधारक किंवा लहान व्यावसायिकांवर कारवाई होते, मात्र मोठ्या आस्थापनांना वेगळा न्याय दिला जाऊ नये. कायद्यापुढे सर्व समान आहेत. भंगाळे गोल्डने दंड न भरल्यास मनपा प्रशासनाने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची हिंमत दाखवावी आणि कोणत्याही दबावाला बळी पडू नये.




