
अमळनेर शिवसेनेच्या तालुकाप्रमुखपदी गुलाबराव पाटील यांची नियुक्ती
अमळनेर : अमळनेर शिवसेनेच्या तालुकाप्रमुख पदी गुलाबराव काशिनाथ पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन तसेच शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली असून शिवसेना सचिव मा. संजय मोरे यांच्या सहीचे नियुक्तीपत्र आज शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्राप्त झाले.
याचबरोबर उपजिल्हाप्रमुख पदी माजी तालुकाप्रमुख प्रथमेश मधुकर पवार आणि विधानसभा क्षेत्र प्रमुख पदी माजी तालुकाप्रमुख सुरेश अर्जुन पाटील यांची तसेच शिवसेना शहरप्रमुख पदी प्रथमच दोन तरुण कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे. त्यामध्ये विलास सुकदेव कंखरे (पैलाड) व भरत प्रकाश पवार (बंगाली फाईल) यांची शहरप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
अमळनेर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे शहरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आणि प्रथमच नगरपरिषदेवर भगवा फडकला. त्यानंतर पहिल्यांदाच नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून त्यामध्ये नवे व जुने पदाधिकारी यांचा समन्वय साधण्यात आल्याचे नवनियुक्त तालुकाप्रमुख गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
आगामी विधानसभा निवडणुकीत अमळनेर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकवून शिरीषदादा चौधरी यांना पुन्हा आमदार करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे, तसेच कार्यकारिणीचा विस्तार करून “गाव तिथे शाखा” या संकल्पनेनुसार शाखा सुरू करून सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय व हक्कांसाठी रस्त्यावर उतरून काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील, माजी आमदार शिरीषदादा चौधरी, आ. किशोर आप्पा पाटील, आ. अमोल दादा पाटील, आ. चंद्रकांत अण्णा सोनवणे, आ. चंद्रकांत भाऊ पाटील, मा. खा. उन्मेश दादा पाटील, जिल्हाप्रमुख वासुदेव भाऊ पाटील, महिला आघाडीच्या विभागीय प्रमुख सरिता ताई माळी तसेच नगराध्यक्ष डॉ. परिक्षीत बाविस्कर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
अनुभवी व कर्तव्यतत्पर व्यक्तीची तालुकाप्रमुख पदी तसेच इतर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या निवडीचे स्वागत केले आहे.




