
टीम इंडियाच टी ट्वेंटी मध्ये “धुरंधर” ! ; न्युझीलँडचा धुव्वा !
सलग दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद ; तीन T20 विश्वचषक नावावर
अहमदाबाद ववृत्तसंस्था: भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ संघाने टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दणदणीत विजय मिळवत इतिहास रचला. प्रथम फलंदाजी करताना भारताने उभारलेल्या २५६ धावांच्या डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ चा डाव अक्षरशः पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला.
भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर किवी फलंदाजांना टिकाव धरणे कठीण ठरले आणि अखेर भारताने टी-२० विश्वचषकावर आपले नाव सुवर्ण अक्षरात कोरले.
प्रथम फलंदाजी करताना संजू सॅमसन याने साकारलेल्या ‘विराट’ खेळीने भारताला भक्कम पाया मिळवून दिला.
त्याला अखेरच्या षटकांत हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे यांच्या तुफानी फटकेबाजीची साथ लाभली. त्यामुळे भारताने निर्धारित २० षटकांत ५ बाद २५५ धावांचा विक्रमी टप्पा गाठला. टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात २०० पेक्षा अधिक धावा करणारा भारत हा जगातील पहिलाच संघ ठरला. संजू सॅमसनने या सामन्यात विराट कोहली याचे तीन मोठे विक्रम मोडीत काढत भारताला मजबूत स्थितीत नेले, तर अखेरीस शिवम दुबेने अवघ्या आठ चेंडूत २६ धावा करत न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला.
विजयासाठी २५६ धावांचे महाकाय लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडची सुरुवातच डळमळीत झाली.
भारतीय गोलंदाजांच्या अचूक आणि आक्रमक गोलंदाजीमुळे एकामागून एक किवी फलंदाज माघारी परतले. मोठ्या आव्हानाचा पाठलाग करण्याऐवजी न्यूझीलंडचा संघ केवळ बचावात्मक खेळ करताना दिसला. अखेरीस भारतीय गोलंदाजांनी संपूर्ण डाव गुंडाळत न्यूझीलंडला पराभवाची धूळ चारली.
या ऐतिहासिक विजयासह भारताने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सातव्यांदा २५० हून अधिक धावा करण्याचा आणि विश्वचषक जिंकण्याचा दुहेरी आनंद साजरा केला. भारतीय संघाच्या या दैदिप्यमान कामगिरीमुळे देशभरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून चाहत्यांकडून संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




