
सावदा शहरात इफ्तार रोजा पार्टीतून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश
जिलानी मिशन ग्रुपच्या पुढाकारातून आयोजन; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
सावदा, : पवित्र रमजान महिन्यानिमित्त सावदा शहरात आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार रोजा पार्टीतून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सुंदर संदेश देण्यात आला. शहरातील विविध राजकीय, सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा अनोखा कार्यक्रम उत्साहात पार पडला. शहरातील रोजेदार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रोजा सोडत एकात्मतेचा आणि बंधुभावाचा संदेश दिला.
या कार्यक्रमात रोजेदारांसाठी शरबत, मॅंगो ज्यूस, विविध फळे, खजूर तसेच शेव-चिवडा, लाडू, भजी, समोसा आणि इतर फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. या सर्व आयोजनाची जबाबदारी शहरातील सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या जिलानी मिशन ग्रुपने पार पाडली. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी शहरातील तरुणांनी स्वतःहून निधी जमा करून नियोजन केले होते. “मोठा कार्यक्रम करण्यासाठी मोठी संपत्ती नव्हे तर मोठे मन आवश्यक असते,” असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माजी नगराध्यक्ष राजेश (भाऊ) वानखेडे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, नगरसेवक पंकज येवले, समाजसेवक शेरखान, नगरसेवक फिरोज लेफ्टी, मनीष भंगाळे, शरीफ तडवी, कामीळ मेंबर, पत्रकार युसुफ शाह, शेख फरीद, कमरुद्दीन शेख उस्मान, नाजीम भाई डायमंड, निसार शेख नबी तसेच सचिन भराटे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी शहरात जातीय सलोखा कायम राहावा, समाजात बंधुभाव वाढावा आणि सर्व धर्मीयांनी एकत्र येऊन शांतता व सौहार्द जपावे, यासाठी प्रार्थना करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन आणि पाहुण्यांची आदरातिथ्यपूर्ण व्यवस्था केल्याबद्दल जिलानी मिशन ग्रुपच्या कार्यकर्त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.




