
सावदा शिवारात ९३ गांजाच्या झाडांचा साठा जप्त
पोलिसांची धडक कारवाई; एकास अटक
सावदा (प्रतिनिधी) : सावदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत बैरम बुवा देवस्थान परिसरातील शेतात अवैधरित्या गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी धडक कारवाई करत ९३ गांजाची झाडे जप्त केली आहेत. या प्रकरणी एका संशयितास अटक करण्यात आली असून परिसरात खळबळ उडाली आहे.
गोपनीय माहितीवरून छापा
गोपनीय माहितीच्या आधारे सावदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी (दि. १०) दुपारी सुमारे चार वाजता सावदा-फैजपूर मार्गावरील गुरुकुल इंग्लिश स्कूलजवळील बैरम बुवा देवस्थान परिसरातील गट क्रमांक ४६३ मधील शेतावर छापा टाकण्यात आला. या शेतात निलेश रमेश पाटील (वय ४०, रा. सावदा) यांनी गांजाची लागवड केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त
छाप्यादरम्यान शेतात ९३ गांजाची झाडे आढळून आली. पोलिसांनी ही सर्व झाडे जप्त केली असून त्यांचे एकूण वजन सुमारे २८ किलो ५४० ग्रॅम आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची अंदाजे किंमत १ लाख ९४ हजार ७२ रुपये इतकी असल्याची माहिती आहे.
अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा
या कारवाईदरम्यान कृषी अधिकारी राजेंद्र कोंडे, नायब तहसीलदार गणेश साळी, तलाठी रशीद तडवी तसेच मुक्ताईनगर येथील फॉरेन्सिक पथकाच्या सदस्यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला.
एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा
या प्रकरणी सावदा पोलीस स्टेशनमध्ये एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.




