जळगांव;- कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळापासून संरक्षण करण्यासाठी जिल्हा स्थानिक तक्रार समितीवर अध्यक्ष व सदस्य या पदासाठी 18 ऑगस्ट पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ.वनिता सोनगत यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
कामाच्या ठिकाणी महिलांना काम करण्यास पोषक आणि लैंगिक छळापासून मुक्त वातावरण मिळावे. या हेतूने कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम २०१३ आणि ११ सप्टेंबर २०१४ च्या शासननिर्णयान्वये जिल्हास्तरावर स्थानिक तक्रार समिती गठीत करण्याची तरतूद आहे. या समितीच्या अध्यक्ष पदासाठी सामाजिक कार्याचा ५ वर्षांचा अनुभव असावा. महिलांच्या न्याय हक्कासाठी प्रतिबद्ध असलेली महिला अध्यक्ष म्हणून नेमण्यात येईल.
सदस्य पदांच्या दोन सदस्यांपैकी महिलांच्या न्याय हक्कासाठी प्रतिबध्द असलेली अशासकीय संघटन / संघ किंवा लैंगिक छळाच्या विषयाशी परिचित असलेले स्त्री असावी, किमान एक सदस्यांची पार्श्वभूमी प्राधान्यतः कायदयाची असावी. तसेच कायदयाची पदवी घेतलेली असावी. व महिला व बालकांच्या क्षेत्रात कार्य केलेले असावे. तसेच किमान एक नामनिर्देशित सदस्य अनुसूचित जाती, जमाती, किंवा इतर मागासवर्ग किंवा अल्पसंख्यांक समाजातील महिला असावी. सदर स्थानिक तक्रार समितीचा कार्यकाळ हा तीन वर्षाचा राहील. कोणत्याही अपराधासाठी दोशी ठरविलेल्या, कोणत्याही कायदयान्वये त्याच्या विरुद्ध अपराधी चौकशी प्रलंबित असेल तर सदर उमेदवार हे अर्ज करण्यास पात्र राहणार नाहीत.
पात्र उमेदवारांनी १८ ऑगस्ट पर्यंत जिल्हा व महिला बाल विकास कार्यालयात अर्ज सादर करावेत. असे आवाहनही श्रीमती सोनगत यांनी केले आहे.