खान्देशगुन्हेजळगांव

पत्नीच्या खुनाच्या प्रयत्नाप्रकरणी पतीला ७ वर्षे सश्रम कारावास

पत्नीच्या खुनाच्या प्रयत्नाप्रकरणी पतीला ७ वर्षे सश्रम कारावास

अमळनेर जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल 

अमळनेर (प्रतिनिधी) : पत्नीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अमळनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी पतीला ७ वर्षे सश्रम कारावास व २ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. भगवान रामदास शिंपी (वय ६०, रा. ताडेपुरा, पैलाड, ता. अमळनेर) असे दोषी ठरलेल्या आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणाची अधिक माहिती अशी की, भगवान शिंपी हे व्यवसायाने टेलरिंगचे काम करत होते आणि ते रवी टेलर यांच्या दुकानात कामाला होते. ते पत्नी सुरेखा शिंपी यांना नेहमी मारहाण करत असल्याने सुरेखा यांनी याबाबत रवी टेलर यांच्याकडे तक्रार केली होती. त्यांनी दुसऱ्या दिवशी भगवान यांना समज देण्याचे सांगितले होते.

दरम्यान, १ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी सुरेखा शिंपी या मजुरीचे काम करून घरी परतल्या असताना त्यांचे पती भगवान शिंपी घरी आले. त्यावेळी त्या मुलगी रोशनी हिच्याशी फोनवर बोलत होत्या. यावरून भगवान शिंपी यांनी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत शिवीगाळ केली आणि तिला ठार मारण्याची धमकी देत घराबाहेर निघून गेले. काही वेळानंतर रात्री सुमारे आठ वाजेच्या सुमारास ते पुन्हा घरी आले. त्यावेळी सुरेखा या घरासमोरील ओट्यावर बसल्या असताना त्यांनी शिवीगाळ करत चापट-बुक्यांनी मारहाण केली आणि खाली पाडले. त्यानंतर पॅन्टच्या खिशातून चाकूसारखे धारदार हत्यार काढून त्यांच्या गळ्यावर, मानेवर, हनुवटीवर तसेच दोन्ही हातांवर वार केले.

या हल्ल्यात सुरेखा शिंपी गंभीर जखमी झाल्या. दरम्यान त्यांचा मुलगा गणेश घरी आला तसेच गल्लीतील नाना चौधरी व इतर नागरिक जमा झाल्याने आरोपी तेथून पळून गेला. जखमी सुरेखा यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी भगवान शिंपी यांच्याविरुद्ध पत्नीच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.

या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे यांनी केला. हा खटला अमळनेर येथील जिल्हा न्यायाधीश क्र. १ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश सी. व्ही. पाटील यांच्या न्यायालयात चालला. सरकारी वकील अॅड. के. आर. बागुल मंगरूळकर यांनी या खटल्यात एकूण सहा साक्षीदार तपासले. फिर्यादी सुरेखा शिंपी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार रवी टेलर व ज्ञानेश्वर संतोष तसेच पंच व अमळनेर ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. प्रकाश ताडे यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या.
फिर्यादीवर चाकूने झालेल्या जखमांमुळे आरोपीचा तिला ठार मारण्याचा उद्देश स्पष्ट होत असल्याचे न्यायालयात सिद्ध झाल्याने न्यायालयाने आरोपीला भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७ अन्वये दोषी ठरवत ७ वर्षे सश्रम कारावास व २ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी २ वर्षे कारावास व १ हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली.

या खटल्याच्या कामकाजात पोलीस कर्मचारी पुरुषोत्तम वाल्डे, पीएसआय उदयसिंग सांळुके, पोलीस कॉन्स्टेबल राहुल रणधीर, प्रमोद पाटील, सतीष भोई तसेच भरत इशी यांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button