
जिल्ह्यात तापमान ४० अंशांच्या उंबरठ्यावर; उष्णतेच्या लाटेचा इशारा, प्रशासन सतर्क
जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील तापमानाचा पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर पोहोचण्याची शक्यता असून पुढील आठवडाभर उष्णतेची तीव्रता कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. ११ ते १६ एप्रिल दरम्यान आकाश स्वच्छ राहणार असून पावसाची कोणतीही शक्यता नसल्याने उकाडा अधिक तीव्र जाणवणार आहे.
११ आणि १२ एप्रिल रोजी कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल, तर १३ ते १६ एप्रिलदरम्यान तापमान ४० अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेत उष्णतेचा प्रकोप वाढणार असून नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागणार आहे.
सतत वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः शेतकरी, बांधकाम कामगार, वीटभट्टी कामगार तसेच बाहेर काम करणाऱ्या नागरिकांनी अधिक दक्ष राहण्याची गरज आहे. आरोग्य तज्ञांनी भरपूर पाणी पिणे, दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळणे, हलके कपडे परिधान करणे आणि उन्हात दीर्घकाळ राहणे टाळण्याचा सल्ला दिला आहे.
अत्यंत उष्णतेच्या पार्श्वभूमीवर कामगार, मजूर तसेच असंघटित क्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. नियोक्ते, उद्योग तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांना कामाच्या वेळांमध्ये बदल, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि विश्रांतीची सोय याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.
उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कामगारांचे आरोग्य आणि सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून सर्व संबंधित विभाग, उद्योग व स्थानिक संस्था यांनी समन्वयाने काम करून उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
“उष्णतेच्या पार्श्वभूमीवर कामगारांच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्व विभागांनी समन्वय साधून उपाययोजना काटेकोरपणे राबवाव्यात,” असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी केले आहे.




