
जळगावचे नवे अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांनी पदभार स्वीकारला
कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्यावर भर
जळगाव (प्रतिनिधी) जळगावचे नवनियुक्त अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांनी आपला पदभार अधिकृतपणे स्वीकारला असून, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. राज्य शासनाच्या बदली व पदोन्नती आदेशानुसार त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
यापूर्वी या पदावर कार्यरत असलेले अशोक नखाते यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांच्या जागी गावित यांची नियुक्ती करण्यात आली. नखाते यांच्या बदलीबाबत स्वतंत्र आदेश येणे बाकी आहे. पदभार स्विकारताना नखाते यांनी गावित यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
पदभार स्विकारल्यानंतर गावित यांनी गुन्हेगारी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थेतील सुधारणा तसेच नागरिकांशी समन्वय वाढवण्यावर विशेष भर दिला जाईल, असे स्पष्ट केले. “जिल्ह्यात शांतता आणि सुरक्षितता राखणे हेच सर्वोच्च प्राधान्य राहील,” असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, संदीप गावित यांनी यापूर्वी जळगाव विभागाचे पोलिस उपअधीक्षक म्हणून काम पाहिले असून, जिल्ह्याची सखोल माहिती त्यांना आहे. त्यांनी ३१ जुलै २०२५ रोजी भुसावळ विभागाची जबाबदारीही सांभाळली होती. दोन वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी केलेल्या प्रभावी कामामुळे त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल जिल्हावासीयांमध्ये सकारात्मक अपेक्षा व्यक्त होत आहेत.




