पाचोरा ;- शहरातील कृष्णाजी नगर भागातील बंद घराचे कुलूप तोडुन घरात प्रवेश करत अज्ञात चोरट्यांनी कपाटात ठेवलेले अडीच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
बापुराव वामन पाटील (वय – ६७) रा. कृष्णाजी नगर, डाक बंगला समोर, पाचोरा हे दि. ११ आॅगस्ट रोजी बाहेरगावी गेले होते. १२ आॅगस्ट रोजी नितीन पाटील यांनी बापुराव पाटील यांना भ्रमणध्वनीद्वारे सांगितले की, तुमच्या घराचा मागचा दरवाजा उघडा आहे. असे कळताच बापुराव पाटील यांनी घरी येवुन पाहिले असता घराच्या मागच्या बाजूचा दरवाजाचा कडी कोंडा तुटलेल्या अवस्थेत आढळुन आला. घरात प्रवेश करुन बघितले असता बेडरूम मधील कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसुन आला. यासोबतच कपाटाच्या तिजोरीत ठेवलेले सोन्याच्या दागिन्यांचे बाॅक्स देखील रिकामे दिसुन आले. बापुराव पाटील यांनी तात्काळ पाचोरा पोलिस स्टेशन गाठत घराच्या कपाटाच्या तिजोरीत ठेवलेले अडीच लाख रुपये किंमतीचे पाच ते सहा तोळे सोने चोरीस गेल्याने अज्ञात चोरट्यांविरुद्ध पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला असुन या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे हे करीत आहे.