गुन्हे

मुस्लिम महिलेला रायफलचा धाक दाखवून ‘जय माता दी’ म्हणायला लावले

चौघांची हत्या करणाऱ्या चेतनसिंहचा आणखी एक प्रताप उघड

मुंबई : जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये गोळीबार करून आरपीएफ अधिकाऱ्यासह चौघांची हत्या करणारा जवान चेतनसिंह चौधरी (३३) याने एका मुस्लीम महिलेलाही रायफलचा धाक दाखवून ‘जय माता दी’ म्हणण्यास भाग पाडले. यावेळी महिलेने त्याच्या रायफलला हात लावल्यानंतर त्याने तिला गोळय़ा घालून ठार मारण्याची धमकी दिली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. जयपूर एक्स्प्रेसच्या ‘बी ३’ डब्यात हा प्रकार घडला असून रेल्वेमधील सीसीटीव्ही कॅमेरात हा संपूर्ण प्रकर चित्रित झाला आहे.

सीसीटीव्हीच्या मदतीने रेल्वे पोलिसांनी या महिला प्रवाशाची ओळख पटवून तिचा जबाब नोंदवला आहे. आरोपी चेतनसिंहने ३१ जुलै रोजी रायफलचा धाक दाखवून महिलेला थांबवले आणि ‘जय माता दी’ म्हणण्यास सांगितले. घाबरलेली महिला ‘जय माता दी’ म्हणाली. पण त्यावर त्याचे समाधान झाले नाही. त्याने पुन्हा तिला मोठय़ा आवाजात ‘जय माता दी’ म्हणण्यास सांगितले. त्यावेळी महिलेने त्याची रायफल बाजूला करून ‘तू कोण आहेस?’ असे विचारले. रायफल बाजूला केल्यामुळे चेतनसिंह संतापला व त्याने रायफलला पुन्हा हात लावल्यास गोळय़ा घालेन, अशी महिलेला धमकी दिली.

याप्रकरणी महिलेला साक्षीदार करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी चेतनसिंहविरोधात भादंवि १५३ (अ) अंतर्गत धार्मिक द्वेष निर्माण केल्याप्रकरणी कलम वाढवण्यात आले होते. महिलेची साक्ष धार्मिक द्वेष निर्माण केल्याबाबत आरोप सिद्ध करण्यात महत्त्वपूर्ण ठरणार आहे. चेतनसिंहने असगर याच्या मृतदेहाच्या शेजारी उभे राहून धार्मिक द्वेष पसरवणारे भाष्य केलेली ध्वनिचित्रफीत व्हायरल झाली होती. यासंदर्भातील ध्वनिचित्रफित समाजमाध्यमावर प्रसारित झाली होती. या ध्वनिचित्रफीतीच्या सत्यतेबाबत तसेच त्यातील आवाज आरोपी चेतनसिंह याचाच असल्याची पडताळणी करण्यात आली आहे. त्यासाठी चेतनसिंहच्या आवाजाचे नमुने, छायाचित्रे न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आली होती. ध्वनिचित्रफितीचे रासायनिक विश्लेषण करून पडताळणी करण्यात आली आहे. जयपूर- मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमध्ये चार प्रवाशांना गोळय़ा झाडून हत्या करणाऱ्या आरोपी चेतनसिंह बोरिवली रेल्वे पोलिसांच्या अटकेत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button