खान्देशगुन्हेजळगांवराजकीयशासकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या निधीतून पोलीस आराम कक्षाचे नूतनीकरण कामाचे लोकार्पण

चाळीसगांव :- सकारात्मक कामातून लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या संदर्भातला लोकांचा विश्‍वास वाढेल अशा प्रकारचे काम पोलीस प्रशासनाकडून झाले पाहीजे. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य लोकप्रतिनिधी म्हणून आपण द्यायला तयार असल्याचे प्रतिपादन चाळीसगांवचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केले.
एखाद्या कामावर किती खर्च झाला याला महत्व नाही तर झालेले काम किती व्यावहारीक आणि लोकोपयोगी आहे हे महत्वाचे असल्याचे आ.मंगेश चव्हाण म्हणाले आणि शहराची सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी अजुन काही पोलीस चौक्या व सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची आवश्यकता असेल तर त्यासाठी आपण सहकार्य करण्यास तयार असल्याचेही ते म्हणाले.

चाळीसगांव शहराचा विस्तार वाढला आहे. औद्योगिकीकरण देखील मोठ्या प्रमाणावर झाले आहे आणि म्हणून पोलीसांची कार्यक्षमता वाढणे आवश्यक आहे, त्यासाठी त्यांना सर्व सुविधा देण्याची देखील आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. शहरात बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीसांना राहण्याची आणि आरामाची कोणतीही हक्काची जागा नव्हती, असलेले आराम कक्ष आरामासाठी उपयोगाचे राहीलेले नव्हते. त्यामुळे पोलीसांना लॉजेस्वर किंवा मंगल कार्यालयामध्ये राहावे लागत होते. या सगळ्या परिस्थीतीच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांनी आराम कक्षाच्या नुतनीकरणाचा प्रश्‍न आपल्यासमोर ठेवला आणि आपण तात्काळ आराम कक्षाच्या नुतनीकरणासाठी 10 लाख रूपयाचा निधी आपल्या आमदार निधीतुन दिला असे मंगेश चव्हाण यांनी सांगितले.
शहरातल्या वीर सावरकर चौकातून जो रस्ता जातो त्या रस्त्याच्या दोन्ही बाजुला मोठ्या प्रमाणावर दुचाकी गाड्या लागलेल्या असायच्या त्यामुळे रहदारीला मोठा अडथळा या ठिकाणी निर्माण व्हायचा. या गोष्टीच्या पार्श्‍वभूमीवर आपण आपल्या आमदार निधीतून पैसे देवून वीर सावरकर चौकाचे नुतनीकरण केले आणि या ठिकाणी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची वाहने लावण्याची व्यवस्था झाल्याने सदर रस्त्यावर आता रहदारीला अडथळे निर्माण होत नसल्याचेही ते म्हणाले.

शहराच्या वाढत्या विस्ताराच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस कर्मचारी कमी असल्याचा देखील प्रश्‍न आपल्या कानावर घालण्यात आला, त्यादृष्टीने देखील आपण प्रयत्न करणार असल्याचे आणि चाळीसगांव शहर पोलीस स्टेशनला पोलीस बळ अधिक मिळण्याच्या दृष्टीने सरकारकडे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या दिड महिन्यात शहरात चोरीच्या घटना कमी झालेल्या आहेत. विशेष म्हणजे अनेक गुंड तडीपार करण्यात आले
आहे. त्यामुळे शहरातली गुंडगिरी देखील कमी झाली आहे, याचे सारे श्रेय पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांना असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलीसांच्या कामात राजकीय हस्तक्षेप होतो असे जे बोलले जाते त्यात कोणतेही तथ्य नाही असे मी म्हणणार नाही. मात्र मी स्वत: पोलीसांच्या कामात कोणताही हस्तक्षेप करत नाही तर पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचे मनोबल कसे वाढेल आणि शहरातली गुंडगिरी कशी कमी होईल यासाठी आपण पोलीसांना सहकार्य करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

चाळीसगांव शहरातील पोलीसांच्या ज्या काही वसाहती आहेत त्या वसाहतीमधील निवासस्थाने पोलीसांच्या राहण्याच्या देखील लायकीची राहीलेली नाहीत.या गोष्टीच्या पार्श्‍वभूमीवर चांगल्या स्थितीतली पोलीसांसाठी 200 घरे आणि पोलीस अधिकार्‍यांसाठी 18 घरे नव्याने बांधण्यात यावी यासाठीचा जो प्रस्ताव तयार करण्यात आला, तो तातडीने जिल्हा पोलीस अधिक्षकांनी सरकारकडे पाठविला आहे. आपणही या प्रस्तावाचा पाठपुरावा केला आणि हा प्रस्ताव डी.जी.हौसिंग यांच्याकडे पोहोचला असल्याचे आणि पोलीस अधिक्षक एम.राजकुमार, अप्पर पोलीस अधिक्षक रमेशकुमार चोपडे, सहाय्यक पोलीस अधिक्षक अभयसिंग देशमुख आणि पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांच्या चाळीसगांव येथील आणि माझ्या आमदारकीच्या कार्यकाळात पोलीसांची 200 घरे व अधिकार्‍यांसाठी 18 घरे बांधली जावी असा आपला प्रयत्न असल्याचेही मंगेश चव्हाण यांनी सांगितले. चाळीसगांव शहरासाठी आपण अजुन 100 सीसीटीव्ही कॅमेरे देणार असल्याचे आणि हे सीसीटीव्ही कॅमेरे शहरातल्या प्रमुख रस्त्यांवर लावण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.

चाळीसगांव शहर पोलीस स्टेशनचे काम अत्यंत चांगले आहे. जनतेचे पोलीसांना सहकार्य मिळाले तर पोलीस आपले काम अत्यंत चांगल्या पध्दतीने करू शकतात असे पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांनी सांगितले. विशेष म्हणजे चाळीसगांवमध्ये एखाद्या घटनेच्या अनुषंगाने बाहेरून पोलीस पाठविण्याची गरज कधीच निर्माण झाली नाही असे सांगतांना त्यांनी या सार्‍या गोष्टीचे श्रेय पोलीस अधिकारी,कर्मचारी यांच्यासह लोकप्रतिनिधींनाही असल्याचे ते म्हणाले. या तालुक्याला अत्यंत चांगले आणि कर्तव्यदक्ष आमदार मंगेश चव्हाण यांच्या रूपाने मिळालेले आहेत, त्यांचे पोलीसांना सतत सहकार्य असते आणि म्हणून पोलीसांनाही काम करायला हुरूप मिळतो अर्थात आमचे काम चांगले असेल तर त्याचा फायदा जनतेला होतो आणि जनतेचा पोलीसांवरचा विश्‍वास देखील वाढीस लागतो. चाळीसगांव शहरातील पोलीसांच्या आणि अधिकार्‍यांच्या निवासस्थानाचा अतिशय महत्वाचा प्रश्‍न 15 दिवसात मार्गी लावल्याबद्दल त्यांनी आ.मंगेश चव्हाण यांचे आभार मानले.

पोलीस कवायत मैदान परिसरात असलेल्या आणि आ.मंगेश चव्हाण यांच्या स्थानिक निधीतून नुतनीकरण करण्यात आलेल्या पोलीस आराम कक्षाचे उद्घाटन स्वातंत्र्यदिनी आ.मंगेश चव्हाण यांच्या हस्ते आणि जळगांव जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी 1.30 वाजता झाले. यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलीस अधिक्षक अभयसिंग देशमुख, ज्येष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रा.सुनिल निकम, चाळीसगांव पं.स.चे माजी सभापती संजय भास्कर पाटील आणि ब्रिजेश पाटील यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक चाळीसगांव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात गेल्या एक ते दिड महिन्यात शहरातली गुन्हेगारी कमी झाली असल्याचे आणि एकही घरफोडी झाली नसल्याचे सांगितले त्यामागची कारणं देखील त्यांनी विषद केली. चाळीसगांव शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी दोन शिफ्टमध्ये काम करतात, त्यांच्या कामाचे तास जवळपास 12 तास असतात. कदाचित जळगांव जिल्ह्यातले हे पहिले पोलीस स्टेशन असेल ज्या पोलीस स्टेशनचे कर्मचारी, अधिकारी आपले वरिष्ठ जळगांव जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक एम.राजकुमार, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलीस अधिक्षक अभयसिंग देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील नागरीकांना सुरक्षितता देण्यासाठी, गुन्हेगारी कमी करण्यासाठी आणि पोलीसांवरील जनतेचा विश्‍वास वाढण्यासाठी दोन शिफ्टमध्ये काम करतात. अर्थात पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांमध्ये ही जी काही काम करण्याची उर्मी निर्माण झाली आहे व प्रेरणा मिळाली आहे त्याला प्रामुख्याने आ.मंगेश चव्हाण आणि माझ्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी केलेले सहकार्य आणि दिलेले प्रोत्साहनच कारणीभुत असल्याचेही त्यांनी सांगितले. माझे सर्व अधिकारी आणि कर्मचारी अतिशय प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत असल्याचे संदिप पाटील म्हणाले आणि त्यांनी आमदार साहेबांकडे पोलीसांच्या इतर काही समस्यांच्या अनुषंगाने देखील काही मागण्या केल्या.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अमोल नानकर यांनी केले. कार्यक्रमास ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर जाधव,मेहुणबार्‍याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णु आव्हाड,सागर ढिकले,विशाल टकले, पीएसआय योगेश माळी, सुहास आव्हाड यांच्यासह शहर पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी, ज्यांनी पोलीस आराम कक्षाचे नुतनीकरण केले ते कोदगांवचे ग्रामपंचायत सदस्य आणि सुप्रसिध्द बांधकाम व्यावसायिक भुषण पाटील यावेळी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे आभार एपीआय सागर ढिकले यांनी मानले.

पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांच्या हस्ते खरजई नाका आणि करगांव रोड या ठिकाणच्या नव्याने सुरू करण्यात येणार्‍या पोलीस चौक्यांच्या नुतनीकरणाच्या कामास प्रारंभ करण्यात आला. त्याचबरोबर सुरक्षित गांव म्हणून वाघडू या गांवालाही पोलीस अधिक्षकांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या समवेत भेट दिली. वाघडू गांवात लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. जिल्ह्यातले हे पहिले सुरक्षित गांव आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button