जळगाव l १७ ऑगस्ट २०२३ l पुण्याचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी व जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तर सुब्रतो मुखर्जी फुटबॉल क्रीडा स्पर्धांना आजपासून जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते या स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी गुरूदत्त चव्हाण, विविध क्रीडा संघटनेचे पदाधिकारी, खेळाडू उपस्थित होते. १७ ते २० ऑगस्ट २०२३ या कालावधीत श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे या स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या स्पर्धेत विविध जिल्ह्यातील पुरुषांचे ९ संघ व महिलांचे ९ संघातील एकूण ४५० खेळाडू, संघ व्यवस्थापक व क्रीडा मार्गदर्शक तसेच २०० पंच पदाधिकारी, शासकीय अधिकारी – कर्मचाऱ्यांसह सुमारे ५५० व्यक्ती सहभागी होत आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्रातील नामवंत फुटबॉल खेळाडू सहभागी होत असून या खेळाडूंचे कौशल्य पाहण्याची संधी विद्यार्थी, खेळाडू व नागरिकांना स्पर्धेच्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे.
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण कार्यक्रम २० ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धा १७ ते २० ऑगस्ट या दरम्यान सकाळी ८ वाजता ते संध्याकाळी ६ वाजता या कालावधीत करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, खेळाडू. क्रीडा संघटना, नागरिक व क्रीडा प्रेमी यांनी फुटबॉल या खेळांच्या स्पर्धा पाहण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केलेले आहे.